कोल्हापूर: दूधगंगेचे पात्र दोन महिन्यात पाचव्यांदा कोरडे; दत्तवाड परिसरात पाणीबाणी

दूधगंगा नदी
दूधगंगा नदी

दत्तवाड: पुढारी वृत्तसेवा: दत्तवाड (ता. शिरोळ) येथील दूधगंगा नदीचे पात्र मार्च व एप्रिल या दोन महिन्यात पाचव्यांदा कोरडे पडले आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली असून पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्यासाठी नागरिकांना पुन्हा विहिरी, कुपनलिका व बोरवेल्स यांचा आधार घ्यावा लागत आहे. तर क्रमपाळीनुसार पाणी येण्यापूर्वीच नदीपात्र कोरडे पडल्याने शेतीतील उभी पिके वाळू लागली आहेत.

वारंवार नदीपात्र कोरडे पडू लागल्याने शेतकऱ्यांचे पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होत आहे. या परिसरातील अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. विहिरीतील पाणीही शेतकऱ्यांना कमी पडू लागले आहे. तर बोरवेलचीही पाण्याची पातळी खालावली आहे. विशेषत: दत्तवाड, टाकळीवाडी भागात अनेक घरगुती बोर बंद पडू लागल्या आहेत. या भागात एकही दमदार वळीव पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांची नजर वळीवकडे लागली आहे.

दत्तवाड ग्रामपंचायत व पाटबंधारे खात्याने नदीवरील दत्तवाड एकसंबा व दत्तवाड मलिकवाड या बंधाऱ्यावरील बर्गे बसवणे गरजेचे आहे. तर दत्तवाड – सदलगा पुलाजवळही पाणी अडवण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. जेणेकरून काळमवाडी धरणातून ठरलेल्या तारखेनुसार पाणी येण्यापर्यंत नदीपात्रातील पाणी टिकून राहील.

दत्तवाड, मलिकवाड बंधाऱ्यावरील बर्गे असूनही का बसवले जात नाहीत. यामागील राजकारण काय? असा सवाल उपस्थित होत आहे. तर दत्तवाड एकसंबा बंधाऱ्यावरील बर्गे चोरीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. येथेही पाणी अडवण्यासाठी ठोस उपाययोजना केली जात नसल्याने नागरिक व शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

पाणी बदलामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले

दूधगंगा नदी पात्र वारंवार दर दहा ते बारा दिवसांनी कोरडे पडू लागल्यामुळे नागरिकांना नदीच्या पाण्याऐवजी बोर व विहिरीचे पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे पाण्यातील होणाऱ्या सततच्या बदलामुळे नागरिकांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news