कोल्हापूर : मुख्यमंत्री शिंदे यांची प्रत्येक नेत्यासोबत वन-टू-वन चर्चा | पुढारी

कोल्हापूर : मुख्यमंत्री शिंदे यांची प्रत्येक नेत्यासोबत वन-टू-वन चर्चा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर, हातकणंगले या दोन्ही महत्त्वाच्या जागा महायुतीतील शिवसेना पक्षाकडे असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जागा प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. येथून शिवसेनेचाच उमेदवार निवडून यावा, यासाठी त्यांनी सलग 3 दिवस हॉटेल पंचशीलमध्ये तळ ठोकला.

रात्री उशिरापर्यंत ते नेत्यांच्या भेटीगाठी घेतात. काही झाले तर दगा-फटका होणार नाही. याची दक्षता घ्यायच्या सूचना त्यांनी नेत्यांना दिल्या आहेत. कागलवर त्यांचे जास्त लक्ष असून, या मतदारसंघातून मोठे मताधिक्य खेचून आणा, अशाही सूचना त्यांनी कागल विधानसभा मतदारसंघातील तिघाही नेत्यांना दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी सभा झाली. त्याच्या पूर्वसंध्येलाच शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापुरात आगमन झाले. शनिवारी दिवसभर आणि रात्री तसेच रविवारी सकाळपासूनच पुन्हा त्यांनी प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला. पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खा. धनंजय महाडिक, आ. प्रकाश आबिटकर, समरजितसिंह घाटगे, माजी आमदार अमल महाडिक, चंद्रदीप नरके यांच्याशी त्यांनी वन-टू-वन चर्चा केली. प्रत्येकासोबत पाऊणतास ते एक तास त्यांनी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या यंत्रणेमार्फत माहिती घेऊन प्रत्येक मतदारसंघातील दुरुस्त्या करण्याच्या सूचना या नेत्यांना दिल्या. कागल, राधानगरी, चंदगड येथून जास्तीत जास्त मताधिक्य खेचण्याचा प्रयत्न करा, असे त्यांनी सांगितले आहे. प्रा. जयंत पाटील, माजी स्थायी सभापती मुरलीधर जाधव यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली.

दरम्यान, रविवारी सकाळपासून मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी राजकीय, सामाजिक तसेच अन्य क्षेत्रांतील मान्यवरांची पंचशील हॉटेलमध्ये रीघ लागली होती. दुपारी तीन वाजेपर्यंत स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी वगळता अन्य कोणालाही मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट भेट दिली नाही. दुपारी साडेतीन वाजता वाळवा-शिराळा येथे होणार्‍या सभेसाठी मुख्यमंत्री शिंदे बाहेर पडले. तिथेही त्यांनी विविध मान्यवरांची भेट घेतली. शिवसेनेच्या धर्मवीर आध्यात्मिक सेलमधील कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साधू शिंदे यांच्या भेटीसाठी सकाळपासून वाट पाहत होते. त्यांची भेट शिंदे यांनी घेतली. सेलच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.

मराठा आरक्षण महायुतीनेच दिले ः मुख्यमंत्री

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाज महायुतीसोबत नसल्यानेच पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रात एवढ्या सभा घेऊन फिरावे लागत असल्याचा आरोप केला होता. याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी महायुतीनेच मराठा समाजाला टिकेल असे आरक्षण दिले आहे. त्यासाठी आयोग स्थापन करून मराठा समाज हा मागास आहे, हे सिद्ध केले. अधिवेशन घेतले आणि त्यानंतर मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले आहे. कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघांतील दोन्ही उमेदवार मराठा समाजाचेच आहेत. त्यामुळे त्या आरोपात तथ्य नसून दोन्ही मतदारसंघांतील उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

Back to top button