कोल्हापूर : मलकापुरात मद्यधुंद पर्यटकांची ट्रकचालकाला बेदम मारहाण

कोल्हापूर : मलकापुरात मद्यधुंद पर्यटकांची ट्रकचालकाला बेदम मारहाण
Published on
Updated on

मलकापूर; पुढारी वृत्तसेवा : मलकापूर शहरातील मंगळवार पेठेशी संलग्न कोल्हापूर नाक्यावर रविवारी (ता.१६) सायंकाळी दुचाकीवरून सुसाट वेगावर स्वार झालेल्या मद्यधुंद पर्यटक युवकांनी एक ट्रक अडवून चालकाला विनाकारण बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. सिनेमा स्टाईलने सुरू झालेल्या या धुमश्चक्रीने शहरातील वाहतुक थांबली होती. घटनास्थळी नागरिकांची वाढणारी गर्दी पाहून हे मद्यधुंद तरुण तात्काळ पसार झाले.

शाहूवाडी तालुक्यात वर्षा पर्यटनाच्या निमित्ताने धबधबे आणि निसर्ग पर्यटनस्थळी गर्दीचा महापूर येऊ लागला आहे. अतिउत्साही मद्यधुंद पर्यटकांची हुल्लडबाजी तितकीच त्रासदायक ठरत आहे. राष्ट्रीय मार्गावरील वाहतूक नियमांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे अशा हुल्लडबाजीला उतच आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

शाहूवाडी तालुक्यातील बर्की, केर्ली, मानोली, पालेश्वर डॅम आदी धबधब्यांसह पावनखिंड, आंबा घाट सारख्या नैसर्गिक ठिकाणांचा आनंद लूटण्यासाठी तालुक्यासह दूरवरून येणारे पर्यटक गर्दी करीत आहेत. यामध्ये चारचाकी तसेच दुचाकीस्वार कॉलेज युवकांची संख्या अधिक आहे. त्यातच पावसाळा म्हंटल की मद्यधुंद लहर असावीच, या मानसिक अवस्थेतील पर्यटकांचा उपद्रव सामान्य पर्यटक व महिलावर्गाला सहन करावा लागत आहे. कोल्हापूर-रत्नागिरी या मुख्य महामार्गावर रहदारीच्या ठिकाणी मद्यधुंद पर्यटक वाहनधारकांना त्रास देताना दिसतात. यातून अनेकदा छोटेमोठे अपघात तसेच वादावादीचे प्रकार उद्भवत आहेत. यासाठी शाहूवाडी पोलिसांनी शहर परिसरात तपासणी नाका उभारून हुल्लडबाज पर्यटकांना पायबंद घालावा, अशी मागणी मलकापूर शहरवासीयांनी केली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news