कोल्हापूर : साके येथे विषारी वैरण खाल्ल्यामुळे चार गायींचा तडफडून मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : साके येथे विषारी वैरण खाल्ल्यामुळे चार गायींचा तडफडून मृत्यू

बिद्री : पुढारी वृत्तसेवा : कागल तालुक्यातील साके येथे अज्ञात व्यक्तीने शेतातील वैरणीवर विषारी औषध फवारणी केली होती. तीच वैरण आणून शेतकरी कुटुंबाने गायींना घातली. ही विषारी वैरण गायींनी खाल्ल्यामुळे चार गायींचा गोठ्यात तडफडून मृत्यू झाला. तानाजी सातापा गवसे व सुवर्णा तानाजी गवसे या शेतकरी कुंटुंबाने जीवापाड पाळलेल्या गायींच्या मृत्यूमुळे सर्व कुंटूब हादरून गेले आहे. या घटनेने सुमारे अडीच ते तीन लाखांचे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कागल तालुक्यातील साके येथे चार दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने वीस गुंठ्यातील झेंडूफूल शेतीवर विषारी औषध फवारणी केली होती. यामुळे सर्वच बाग करपून गेली होती. ही घटना ताजी असताना दोन दिवसापूर्वी येथील कुस्ती वस्ताद तानाजी गवसे यांच्या व्हनाळी रोडवर असणार्‍या भट्टाचा मळा नावाने ओळखल्या जाणाऱ्या शेतातील वैरणीवर अज्ञात व्यक्तीने वाईट हेतूने विषारी औषध फवारणी केली. नेहमीप्रमाणे ही वैरण आणून गवसे यांनी आपल्या गायींना घातली. गायींनी वैरण खाल्ल्यानंतर सुमारे तासाभराने तडफण्यास सुरवात झाली. त्यांनी त्वरीत डॉक्टरांना बोलावले. जिल्हा परिषदेचे व गोकुळचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले. पण उपचाराचा उपयोग होवू शकला नाही. चारही गायींचा तडफडत सायंकाळी गोठ्यातच मृत्यू झाला. या घटनेने सर्व कुंटुंब हादरून गेले आहे. त्यातील एक गाय व वासरू दुसरा चारा घातल्यामुळे वाचले आहे.

साके येथील शेतकरी कुंटुंब आहे. शेती व जनावारांवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. तानाजी गवसे हे कुस्तीचे वस्ताद असून ते खेळाडू घडवत आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. या कुटुंबाला समाजातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन युवा संघटनेचे अनिल पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा : 

Back to top button