Dolby: पिशवी गावात डॉल्बीचा दणदणाट बंद! गावकऱ्यांच्या निर्णयाचे होतेय स्वागत

Dolby: पिशवी गावात डॉल्बीचा दणदणाट बंद! गावकऱ्यांच्या निर्णयाचे होतेय स्वागत
Published on
Updated on

बांबवडे : पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यातील पिशवी गावाने डॉल्बीमुक्त (Dolby)  अभियान राबविण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. गेले तीन महिने या निर्णयाची जाणीवपूर्वक अंमलबजावणी करताना स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी मिळून मानवी आरोग्याला घातक ठरणारा डॉल्बीचा 'दणदणाट' गावातून हद्दपार केल्याचे सुखद चित्र दिसत आहे. या स्तुत्य पायंड्याची दखल घेऊन प्रशासनाने गावाचा गौरव करण्याची गरज आहे.

तालुक्यातील पिशवी गावाला डॉल्बीचे (Dolby)  जनक गाव संबोधले जाते. आता यापुढे जाऊन याच पिशवी गावाने 'डॉल्बीमुक्त' उपक्रम यशस्वीपणे राबवून गावामध्ये शांततामय वातावरण प्रस्थापित करण्याचा विडा उचलला आहे. तालुक्यातील इतर गावांनी या स्तुत्य उपक्रमाचे अनुकरण केल्यास डॉल्बीमधून प्रकटणाऱ्या पराकोटीच्या कर्णकर्कश आवाजातून उद्भवणाऱ्या दुष्परिणामांना कायमचा आळा घालणे सहज शक्य आहे, हाच मौलिक संदेश पिशवी गावकऱ्यांनी दिला आहे. या निर्णयाचे परिसरात स्वागत होत आहे.

बांबवडे बाजारपेठेपासून दक्षिणेला अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर मसाई पठाराशी संलग्न डोंगराच्या पायथ्याशी पिशवी गाव वसले आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील राहिलेल्या या गावामध्ये तरुणाईने पुढाकार घेत डॉल्बीमुक्तीला बळ दिले आहे. याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. गावात सध्या मराठमोळ्या पारंपरिक वांद्यांचा संगीतसाज सोबत घेऊन लग्न समारंभ, अथवा अन्य घरगुती, सामुदायिक कार्यक्रम उरकले जात आहेत.

डॉल्बीच्या कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाचा वयोवृद्ध, हृदयविकार, आजारी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. शिवाय काहींना जीव गमवावा लागल्याच्या परिसरात घटना घडल्या आहेत. कर्णबधिरतेचा धोकाही बळावल्याचे तज्ज्ञांचे अनुमान अंतर्मुख करायला लावणारे ठरत आहे. कार्यक्रमात तसेच सणासुदीला (आग्रहाने वाजणाऱ्या) डॉल्बीच्या निमित्ताने अनेक वादविवाद उफाळून येतात. इर्षेतून तरुण परस्परांशी भिडतात. व्यसनाधीनतेला खतपाणी मिळते. मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषणाला निमंत्रण देणाऱ्या डॉल्बीमुळे समाजाचा समस्त तरुणाईकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालल्याचे वास्तव आहे.

या सर्व नकारात्मक बाबींचा विचार करून पिशवी गावचे लोकनियुक्त सरपंच विनायक पाटील, माजी उपसरपंच नामदेव पाटील, माजी सरपंच आनंदराव तोरस्कर, बाजीराव पाटील, माजी ग्रा.पं सदस्य शरद आंबर्डेकर, कृष्णात अतिग्रे, सर्जेराव पाटील यांच्यासह विधायक विचार जोपासणाऱ्या युवकांनी डॉल्बीमुक्ती अभियानाची साद घातली. याला गावातील महिला, ग्रामस्थांनी मोठ्या हिंमतीने बळ दिले. साहजिकच पिशवी गावात सध्या तरी डॉल्बीचा आवाज पूर्णतः बंद झाला आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news