

Kolhapur Direct Pipeline News
अर्जुनवाडा : काळमवाडी थेट पाईपलाईन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या पाईपलाईनला सोळांकूर कालव्याजवळ व्हॉल्वमधून मोठ्या प्रमाणावर गळती लागली असून, लाखो लिटर शुद्ध पाणी वाया गेले आहे. विशेष म्हणजे ही गळती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच तात्काळ पाणीपुरवठा थांबविण्यात आला, अन्यथा कालव्याचा भराव वाहून जाऊन मोठे नुकसान झाले असते.
ही स्थिती पाहता, कोल्हापूरवासियांना मुबलक, स्वच्छ आणि नियमित पाणी मिळेल का? की ही गळतीच या पाईपलाईनची ओळख होईल, असा सवाल नागरिक विचारत आहेत. या प्रकारामुळे पाईपलाईनच्या दर्जावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाईपलाईन सुरू झाल्यापासून गळतींची मालिका सुरूच असून, कधी विद्युत मोटारीत बिघाड होतो. तर कधी तांत्रिक बिघाड होतो. यामुळे अनेक वेळा पाणीपुरवठा खंडित होतो.
पाईपलाईनच्या कामात निकृष्ट दर्जा आणि देखभाल दुरुस्तीतील हलगर्जीपणा ठळकपणे दिसून येतो. नागरिकांचा रोष अधिक वाढत असून, "एकीकडे पिण्याच्या पाण्याची टंचाई, तर दुसरीकडे लाखो लिटर शुद्ध पाण्याची नासाडी हे महानगरपालिका आणि ठेकेदाराच्या निदर्शनास कधी येणार"? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
याबाबत कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर राजेंद्र माळी म्हणाले की, पाईपलाईन दुरुस्तीसाठी बंद होती ती पुन्हा पहाटे सुरू करण्यात आली. यावेळी व्हॉल्वमध्ये कचरा अडकल्यामुळे गळती सुरू झाली होती, कचरा काढून पाणी पुरवठा सुरू केला आहे. तर याबाबत कालव्याला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे कार्यकारी अभियंते अशोक पवार यांनी सांगितले. गळती एखाद्या दाट लोकवस्तीच्या परिसरात लागल्यास मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्यातील धोके टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना आणि नियोजनबद्ध देखभाल आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.