

अर्जुनवाडा : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणातून पाणीपुरवठा करणारी थेट पाईपलाईन बुजवडे गावाजवळ आज (दि.२०) सकाळी साडेदहाच्या सुमारास फुटली. यामुळे लाखो लिटर शुद्ध पाणी वाया गेले आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच सतत थेट पाईपलाईन फुटत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे तर नुकसान होत आहे. मात्र, कोल्हापूर वासियांना सुद्धा पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. या कामाची चौकशी व्हावी आणि निकृष्ट काम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी भाजपचे जिल्हा कोषाध्यक्ष विलास जाधव यांनी केली आहे.
ही योजना सातत्याने कुचकामी ठरत आहे. या योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यानेच सतत पाईपलाईनला गळती लागत आहेत. आणि विशेष म्हणजे या योजनेचा प्रोजेक्ट मॅनेजर राजेंद्र माळी ही गळती नसून हॉलमधून पाणी जात असल्याचे सांगतात. तर आतापर्यंत कुठेही पाईपलाईन फुटली नसल्याचेही ते सांगतात, यातूनच या कामाचा दर्जा दिसून येतो. त्यामुळे दिवसभर लाखो लिटर पाणी वाया गेले. तर काही शेतकऱ्यांची शेती तुटून कालव्यात गेली आहे. पांडुरंग गुरव आणि बळवंत गुरव यांचे शेत तुटून कालव्यात गेले आहे. तर कालव्यावर बसलेले इंजिनही पाण्याच्या प्रवाहामुळे पाणी आणि मातीच्या खाली दबले आहे. संध्याकाळपर्यंत या पाईप मधून पाण्याचे विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू होता. मात्र, ठेकेदाराने पाणी बंद केले नाही. गळती लागल्यास तात्काळ पाणी बंद होणार असे सांगणारे अधिकारी इकडे फिरकले सुद्धा नाहीत.
आतापर्यंत तुरंबे, अर्जुनवाडा, तळाशी, शेळेवाडी, ठिकपुर्ली, हळदी अशा ठिकाणी पाईपलाईनला गळती लागली. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, अद्याप त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही. ठिकपुर्ली येथे लागलेल्या गळतीच्या कारणातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राजेश माळी यांना अंघोळ घातली होती. तर शेतकऱ्यांनी ही संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र गळतीची ही मालिकाच सुरू असल्याचे सध्या तरी दिसून येते. निकृष्ट कामामुळेच सतत गळती होत असल्याचा आरोप विलास जाधव यांनी केला आहे. घाई गडबडीत केलेल्या या कामात माजी मंत्री यांनी मोठ्या प्रमाणात ढपला पाडलेला आहे, असा थेट आरोप भाजपाचे राज्य कार्यकारणी सदस्य लहू जरग यांनी केला आहे. गळतीमुळे सध्या तरी दोन दिवस कोल्हापूरकरांना पिण्याचे पाणी मिळणार नाही.