

कोल्हापूर : चाळीस वर्षांच्या अखंड संघर्षानंतर आकाराला आलेल्या थेट पाईपलाईन योजनेतून कोल्हापूरकरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू होऊन दीड वर्ष उलटले असले, तरी ही योजना अद्याप स्थिर झालेली नाही. वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, व्हीडीएस प्रणालीतील अडथळे, तसेच नियोजनातील त्रुटींमुळे या योजनेतून नियमित व सुरळीत पाणीपुरवठा होणे अशक्य झाले आहे.
नियमित पाणी मिळावे, या प्राथमिक मागणीसाठी आजही अनेक भागांतील नागरिकांना टँकरवरच विसंबून राहावे लागत आहे. योजना अस्तित्वात आली; पण अंमलबजावणीतल्या ढिसाळपणामुळे शहराच्या तहानेचा प्रश्न सुटलेलाच नाही.
पंचगंगेच्या कुशीत वसलेलं कोल्हापूर हे पाण्याच्या द़ृष्टीने नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध शहर मानलं जातं. मात्र, पंचगंगेचं प्रदूषण दिवसेंदिवस वाढत गेल्याने पिण्याच्या पाण्यासाठी 50 किलोमीटर दूर असलेल्या काळम्मावाडी धरणाकडे वळावं लागलं. तत्कालीन यूपीए सरकारच्या काळात केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान योजनेतून या प्रकल्पासाठी निधी मंजूर झाला. आमदार सतेज पाटील यांनी या योजनेसाठी पुढाकार घेतला. 2014 मध्ये सुरू झालेल्या या योजनेचं प्रत्यक्ष पाणीपुरवठा 2023 च्या ऑक्टोबरमध्ये सुरू झालं. पुईखडी येथे पाईपलाईनचं पाणी पोहोचल्यावर मात्र अद्यापही अनेक भागांत नियोजनातील त्रुटींमुळे पाणी पोहोचलेले नाही.
थेट पाईपलाईन योजनेसाठी बिद्री येथे वीजपुरवठा करण्यात आला असून, ही वीज वाहिनी झाडाझुडपांतून जाते. त्यामुळे वादळी वार्यांमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. अखंड आणि सुरक्षित वीजपुरवठ्यासाठी महापालिकेकडे भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावासाठी 15 ते 20 कोटी रुपयांची गरज असून, तो अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. भूमिगत वीजवाहिन्या टाकल्या जात नाहीत, तोपर्यंत अखंड वीजपुरवठा आणि परिणामी नियमित पाणीपुरवठा शक्य होणार नाही. (समाप्त)
अमृत योजनेच्या माध्यमातून शहरातील अंतर्गत जल वितरण व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही भागांमध्ये जलवाहिन्या टाकण्याचं, काही ठिकाणी टाक्या उभारण्याचं काम चालू आहे. काही टाक्या पूर्ण झाल्या असल्या, तरी अनेक ठिकाणी काम रखडलेले आहे. शिवाजी पार्कमधील टाकीचे काम अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे त्या परिसरात पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही, अशी तक्रार नागरिक करत आहेत. पाणीपुरवठा विभागाकडून मात्र संपूर्ण टाक्यांचे काम पूर्ण झाल्यानंतरच शहरात मुबलक आणि नियमित पाणीपुरवठा करता येईल, असा दावा केला जात आहे.