

Kolhapur Dhamani Backwater Scheme
(दिगंबर सुतार)
म्हासुर्ली : धामणी खोऱ्यातील शेतीला मोठा दिलासा देणारी बॅकवॉटर योजना तब्बल वीस वर्षांनंतर अखेर कायमची बंद झाली आहे. नदीचा प्रवाह उलट दिशेने वळवण्याचे वैशिष्ट्य असलेली ही योजना आता इतिहासजमा झाली असून परिसरात मिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
धामणी परिसरात दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी ही योजना राबविण्यात आली होती. कुंभी नदीतील फुगवट्याचे पाणी लिफ्ट करून धामणी नदीत सोडण्याच्या उद्देशाने लोकप्रतिनिधी व स्थानिकांच्या प्रयत्नांतून ही योजना उभी राहिली. यामुळे कोरड्या पडलेल्या बंधाऱ्यांना पाणी मिळून शेतीला मोठा आधार मिळाला आणि ओसाड जमीन हिरवीगार झाली.
पूर्वी धामणी खोऱ्यातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. नदीत मातीचे बंधारे उभारणे, कोरड्या पात्रात खड्डे खोदणे अशा कठीण उपाययोजना कराव्या लागत होत्या. सन 2000 मध्ये धामणी मध्यम प्रकल्पाचा शुभारंभ झाल्यानंतर या भागाच्या विकासाला चालना मिळाली; मात्र प्रकल्पाचे काम रखडल्याने पाणीटंचाईचे संकट कायम होते.
दरम्यान, कुंभी नदीवरील कळे बंधाऱ्यातील साठा वापरून आंबर्डे बंधाऱ्याजवळ पाणी उचलून धामणी नदीतील विविध बंधाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत होते. यासाठी उच्च क्षमतेचे पंप बसविण्यात आले होते. आ. डॉ. विनय कोरे आणि आ. चंद्रदीप नरके यांच्या पुढाकारातून या योजनेचा विस्तार करण्यात आला.
गेल्या काही वर्षांत धामणी मध्यम प्रकल्पाच्या कामाला वेग आल्याने परिस्थितीत मोठा बदल झाला. यंदा प्रथमच उन्हाळ्यातही धामणी नदीत पाणी प्रवाहित राहिले. परिणामी बॅकवॉटर योजनेची गरज कमी होत गेली आणि अखेर ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जरी ही योजना आता थांबली असली, तरी दुष्काळाच्या काळात शेतीला दिलासा देणारी तिची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. त्यामुळे धामणी खोऱ्यातील नागरिकांच्या मनात या योजनेविषयी विशेष स्थान कायम राहणार आहे.
योजनेचे स्वरूप :
लोकसहभागातून उभी राहिलेली, खासगी तत्वावर चालणारी योजना
पंपाच्या साहाय्याने नदीत पाण्याचा सुमारे 5 ते 10 किमी उलटा प्रवाह
कळे बंधाऱ्यातील अतिरिक्त साठ्याचा उपयोग
वीजपुरवठ्याच्या अडचणींवर मात करत शेतकऱ्यांनी रात्रंदिवस चालवलेली योजना
धामणी प्रश्नी कृती समितीचा उठाव चालू होता. तर लोकप्रतिनिर्धींचे प्रयत्नही शर्थीने चालू होते. त्यामुळे धामणी बारमाही वाहण्याचा दिवस नक्कीच उजाडणार हे माहित होते. हे लोकप्रतिनिधींबरोबर शेतकऱ्यांचे धारिष्ट्य कौतुकास्पद होते.
- डॉ. बदाम पाटील समन्वयक - धामणी खोरे विकास कृती समिती