

बिरू व्हसपटे
शिरढोण : गावातील सुरक्षेचा कणा असलेली सीसीटीव्ही यंत्रणा गेल्या वर्षभरापासून ठप्प पडली असून ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे शिरढोणची सुरक्षा अक्षरशः रामभरोसे झाली आहे. दुरुस्तीबाबत कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने प्रशासनाचा कारभार ‘सलाईन’वर असल्याची टीका नागरिकांतून होत आहे.
दरम्यान, गावात घरफोडी व चोरीच्या घटना घडल्या असतानाही कॅमेरे बंद असल्यामुळे पोलिस तपासात अडचणी निर्माण झाल्या. यावर पोलिसांनीही ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणावर ताशेरे ओढल्याची माहिती पुढे आली आहे. भविष्यात एखादी गंभीर घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.
ग्रामसेवक विराज जथ्थे हे शिकाऊ असल्याची चर्चा असून “वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतो” ही भूमिका केवळ कातडी बचावासाठी असल्याचा आरोप केला जात आहे. गावासाठी अत्यंत संवेदनशील असलेला सीसीटीव्हीचा प्रश्न दुर्लक्षित राहिल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
‘ग्रामसेवक जथ्थे यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह’
ग्रामपंचायतीच्या ढिसाळ व निष्क्रिय कारभारामुळे गावातील सुरक्षा यंत्रणा कोलमडली आहे. केवळ आश्वासने देत वेळ काढला जात असल्याचा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सीसीटीव्हीसारखा संवेदनशील विषय प्रलंबित ठेवणे ही गंभीर बाब असून ग्रामसेवक जथ्थे यांच्या कार्यपद्धतीवर ठोस प्रश्न उपस्थित होत आहेत. तात्काळ कॅमेरे दुरुस्त करून शिरढोण गाव सुरक्षित व भयमुक्त करावे, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.