

Salgar Sadalga highway bike collision
कुरुंदवाड : सलगर–सदलगा महामार्गावर तेरवाड येथे दोन दिवसांत पुन्हा भीषण अपघात झाला. गुरूवारी (दि.९) सकाळी साडेअकराच्या सुमारास तेरवाड येथील वजन काट्यासमोर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन आकाश रमेश गोसावी (वय २५, रा. तेरवाड) याचा जागीच मृत्यू झाला. तर सुनील सिताराम गोसावी (वय ३५, रा. तेरवाड) हा गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश गोसावी हा मोटरसायकल (क्र. एमएच ०९ जीपी २१९) वरून कुरुंदवाडहून तेरवाडकडे येत होता. त्याचवेळी सुनील गोसावी हा मोटारसायकल (क्र. एमएच ०९ ईजे ५८८१) वरून तेरवाडहून कुरुंदवाडकडे जात असताना दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, आकाश याचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या सुनील याला तातडीने जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने जप्त केली आहेत.
दरम्यान, आकाश गोसावी हा आठ दिवसांपूर्वीही रत्नागिरीहून कुरुंदवाडकडे येत असताना अपघातातून बचावला होता. चार दिवसापूर्वी तेरवाड येथील मंदिर परिसर आणि दोन दिवसापूर्वी कुरुंदवाड येथील दर्ग्यासमोर अपघात झाला होता, या अपघातात मात्र प्रत्येक वेळी तो बचावला होता. अखेरच्या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातानंतर आकाश याचा मृतदेह सांगली येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आई-वडील व बहीण असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने तेरवाड परिसरात शोककळा पसरली आहे.