

कोल्हापूर : आंतरराज्य गुन्हेगार सलिम महमंद शेख (वय 37, रा. साहिलनगर, ता. महाड, रायगड), तौफिक महंमद शेख (30, संजय गांधीनगर, चिक्कोडी, जि. बेळगाव) यांच्याकडून चोरी, घरफोडी आणि लुटमारीच्या गुन्ह्यातील सोन्या- चांदीचे दागिने विक्रीसाठी मदत करणार्या कोल्हापूर व इचलकरंजी येथील दोन पंटरसह फुलेवाडी येथील एका सराफ व्यावसायिकला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गुरुवारी अटक केली.
स्थानिक पंटर दस्तगीर मेहबूब मु्ल्ला (37, रा. मराठा चौक, वीर गल्ली, स्वामी कारखान्याजवळ इचलकरंजी), उर्वा आझाद महालकरी (36, साळोखे पार्क, कोल्हापूर) व सोनार संतोष मधुसूदन नार्वेकर (47, रा. फुलेवाडी, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चौकशीत सराईत शेख बंधूंनी करवीर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 9, राधानगरी, वडगाव, आजरा येथील प्रत्येक एक अशा 12 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. संशयिताकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 15 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, असे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले.
आंतरराज्य सराईत गुन्हेगार असलेल्या सलिम शेख व त्याचा भाऊ तौफिक शेख यांना सापळा रचून दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणने मे महिन्यात जेरबंद केले होते. चौकशीत त्यांच्याकडून घरफोडी, चोरीचे 32 गुन्हे उघडकीला आले होते. गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. चोरट्यांची गुन्ह्याची पद्धत व व्याप्ती लक्षात घेऊन पुन्हा ताब्यात घेऊन त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला होता.
सलिम शेख, तौफिक शेख यांनी शहरासह ग्रामीण भागात घरफोडी, जबरी चोरीचे अनेक गुन्हे केल्याची पथकाला माहिती दिली. चौकशीत करवीर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 9, राधानगरी 1, वडगाव 1 व आजरा येथील 1 असे 12 गुन्हे उघडकीला आले. सराईत चोरट्यानी गुन्ह्यातील दागिने स्थानिक पंटर दस्तगीर मुल्ला (रा. जवाहरनगर, इचलकरंजी) याच्या मध्यस्थीने ऊर्वा महालकरी यास दिल्याचे तसेच तौफिक शेख याच्या वाटणीचे दागिने सोनार संतोष नार्वेकर (रा. फुलेवाडी, कोल्हापूर) याला दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने सर्व संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचेही कळमकर यांनी सांगितले.