

कोल्हापूर : चंदगड-गडहिंग्लज परिसरात निर्जनस्थळी वृद्धावर हल्ला करून दागिने लंपास करणार्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखने अटक केली. देवेंद्र दिंगबर पताडे (वय 19, रा. हरळी, ता. गडहिंग्लज) आणि बाळू परशराम नाईक (वय 28, रा. नाईकवाडी, जरळी, ता. गडहिंग्लज) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 2 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अंमलदार प्रवीण पाटील, दीपक घोरपडे व समीर कांबळे यांनी सीसीटीव्ही फुटेजसह खबर्यांकडून चोरट्यांचा माग काढला. दोघे संशयित बुधवारी आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच सापळा रचून दुचाकीवरून आलेल्या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 14 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र व बोरमाळ, 2 मोबाईल हँडसेट, एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला.
संशयितांनी निट्टूर येथे पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावत कोयत्याने हल्ला करून जखमी केले होते. गडहिंग्लज परिसरातही एका वृद्धेवर चाकूने हल्ला करून दागिने लंपास केल्याची कबुली त्यांनी दिली. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.