कोल्हापूर: हुपरीत शिवसैनिक-पोलिसांत शाब्दिक चकमक

कोल्हापूर: हुपरीत शिवसैनिक-पोलिसांत शाब्दिक चकमक

हुपरी: पुढारी वृत्तसेवा: हुपरी नगरपरिषदेने नव्याने जाहीर केलेली पाणीपट्टी दरवाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी आज (दि.३०) ठाकरे गट व युवासेना  यांच्यावतीने  हुपरी नगरपरिषदेला टाळे ठोकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलीस बंदोबस्त असल्यामुळे शिवसैनिक व पोलीस यांच्यात जोरदार झटापट व शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.

हुपरी नगरपरिषदने विशेष पाणीपट्टी दरात दुपटीने वाढ केली आहे, ही दरवाढ नागरिकांचे कंबरडे मोडणारी आहे. त्यात केवळ ५०० रूपयांची कपात करुन नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला आहे. ही दरवाढ दहा दिवसांत मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आज सकाळी शिवसैनिकांनी नगरपरिषदेवर मोर्चा काढला.

यावेळी नगरपरिषदेवर पोलीस बंदोबस्त होता. शिवसैनिकांनी हुपरीकर जनतेला ही दरवाढ मान्य नाही, असे सांगत आंदोलनास सुरवात केली. यावेळी पोलीस व शिवसैनिक यांची जोरदार झटापट व शाब्दिक चकमक झाली. यावेळी शहरप्रमुख राजेंद्र पाटील, शिवाजी जाधव यांनी नागरिकांनी पाणीपट्टी भरू नये, असे आवाहन केले. पोलीस बळाचा वापर करुन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले. नगरपरिषदेच्या विरोधात असहकार आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला.

या आंदोलनात शहरप्रमुख राजेंद्र पाटील, शिवाजी जाधव,  विनायक विभूते, रघुनाथ नलवडे, पूनम पाटील, मीना जाधव, भरत देसाई, भरत मेथे, संताजी देसाई, विजय जाधव, वैभव लायकर, अक्षय चाणक्य, तुळशीराम गजरे  आदी सहभागी झाले होते.

हेही वाचा 

logo
Pudhari News
pudhari.news