कसबा वाळवे: बाजीराव सुतार : आपल्यातील एका शेतकरी बांधवावर कोसळलेल्या दु:खद प्रसंगाने केवळ न हळहळता त्याला त्या दु:खातून बाहेर काढण्यासाठी केलेली मदत मोलाची व गरजेची असते. याचे भान ठेवून वाळवे खुर्द (ता.कागल) ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. शक्य तितकी आर्थिक मदत गोळा केली. अन् अक्षय तृतीयेला चक्क बैलजोडी प्रदान करुन त्या शेतकऱ्याच्या संसाराला हातभार लावत माणुसकीचे दर्शन घडवले. गाववाल्यांच्या या दातृत्वाने खुटाळे दाम्पत्याला गहिवरून आले.
वाळवे खुर्द येथील दिलीप पांडुरंग खुटाळे आपल्या बैलांना छकडा गाडीला जुंपून डोंगराकडील शेताकडे गेले होते. यावेळी काम आटोपून छकडा गाडीत वैरण भरुन घरी जात असताना बैलांचा पाय घसरून छकडा गाडीसह दोन्ही बैल कालव्यात पडले होते. त्यामध्ये दोन्ही बैलांचा बुडून मृत्यू झाला होता. बैलाच्या सहाय्याने औत करुन शेत मशागतीतून ते आपला संसार चालवत होते. या दुर्दैवी घटनेने खुटाळे कुटुंबीयावर मोठे संकट कोसळले होते. बैल नसल्याने त्यांच्या पोटापाण्याचा आधार नाहीसा झाला होता.
गाववाल्यावर आलेल्या या संकटाचे मोठे दुःख होते. पण त्या दु:खाला कवटाळत न बसता त्याचा संसार उभारण्यात आपले योगदान देण्याचा निर्धार त्यांच्या मित्रपरिवाराने केला. एक मेसेज व्हॉट्सॲप ग्रुपवर सोडून मदतीचे आवाहन केले. शंभर रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत लोकांनी मदत केली. अवघ्या आठ तासांत बैलजोडी घेता येईल, इतकी रक्कम जमा झाली. ग्रामस्थांनी बैलजोडी खरेदी करून अक्षय तृतीयेला दिलीपला बैलजोडी प्रदान करुन उभारी देण्याचे कार्य केले.
ग्रामस्थांनी केलेल्या या अद्वितीय कामगिरीमुळे खुटाळे कुटुंबीयांना गहिवरून आले. आपल्या गाववाल्यांच्या या मदतीमुळे दिलीप खुटाळे यांना हत्तीचे बळ मिळाले. यावेळी कवी कुसुमाग्रज यांच्या ओळींची आठवण येते. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा…
हेही वाचा