कसबा वाळवे: पुढारी वृत्तसेवा : पालकरवाडी (ता. राधानगरी) येथील बाळासो नारायण भोईटे (वय ४१) यांचा कालव्यामध्ये पाय घसरल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२४) सकाळी ११ च्या सुमारास घडली. बाळासो यांचा पाणी आणण्यासाठी गेले असता दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शेती करून कुटुंबाची गुजराण करणारे बाळासो नेहमीप्रमाणे कालव्याच्या शेजारी असणाऱ्या शेतामध्ये गेले होते. घरचे सर्वच लोक शेतात असल्याने पिण्यासाठी पाणी संपल्याने ते कालव्यामध्ये पाणी आणण्यासाठी गेले असता त्यांचा पाय घसरून ते पाण्यामध्ये पडले. पोहता न येणाऱ्या बाळासो यांना पाणी वाहते व वेगवान असल्याने स्वतःचा जीव वाचवता आला नाही.
काही वेळातच ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. घटनास्थळावर लोकांनी मोठी गर्दी केली होती. बाळासो यांना पाण्यातून बाहेर काढले, पण खूप उशीर झाला होता. पाण्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. ग्रामीण रुग्णालय सोळांकूर येथे त्यांना नेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषीत करुन शवविच्छेदन केले. या घटनेची फिर्याद पोलीस पाटील शंकर पोतदार व सुभाष भोईटे यांनी राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये दिली. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल पी. डी. गुरव करत आहेत.
बाळासो यांच्या पश्चात आई-वडील पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. बाळासो यांच्या निधनानंतर आईवडील, पत्नी व मुलांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेमुळे पालकरवाडी आणि पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
कालव्यातील पाणी पाझरु नये, म्हणून कालव्याला सिमेंट काँक्रीटचे अस्तरीकरण केले असल्याने पाण्याला प्रचंड वेग येतो. दोनच दिवसांपूर्वी दोन बैलांचा कालव्यात बुडून मृत्यू झाला होता. अस्तरीकरण असल्याने कालव्यातून बाहेर पडताच येत नाही, त्यामुळे कालव्याच्या आसपास शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांबरोबरच स्वतःच्या जीवाची खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन बिद्रीचे संचालक उमेशराव भोईटे यांनी केले आहे.
हेही वाचा