कोल्‍हापूर : तरूणाचा असाही प्रामाणिकपणा! रस्त्यावर सापडलेले १ लाख रूपये केले परत

तरूणाचा प्रामाणिकपणा
तरूणाचा प्रामाणिकपणा

सरुड : पुढारी वृत्तसेवा शाहूवाडी तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या मालेवाडी च्या शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणातून बांबवडे-कोकरूड दरम्यान कापशी गावच्या हद्दीतील हम रस्त्यावर तब्बल १ लाख रुपये चलनी रोकड पडलेली होती. संजय नामदेव जाधव (वारूळकर) या तरुणाने ही रक्‍कम आहे त्या स्थितीत संबंधित बँक कर्मचाऱ्यांना परत करून समाजातील उदात्त प्रामाणिकपणाचे दर्शन दिले. दरम्यान या प्रामाणिकपणाबद्दल संजय जाधव या तरुणावर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

घटनेची हकीकत अशी, बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये कार्यरत दोन कर्मचारी हे बँकेकडील चलन हस्तांतर करण्यासाठी सोमवारी (ता. १०) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन बांबवडे कडून मालेवाडी शाखेकडे निघाले होते. यावेळी सदरची रोकड भरलेल्या कापडी बॅगेची चेन अनावधानाने निघून वडगाव ते वारणा कापशी दरम्यान जामदार गुरुजी मठानजीक या बॅगेतील शंभर रुपये चालनाचे दहा बंडल रस्त्यावर पडले. मात्र, बँकेचे संबंधित कर्मचारी दुचाकीवरून तसेच पुढे निघून गेले.

दरम्यान कापशी येथील संजय जाधव हे गावाकडून बांबवडेकडे निघाले असताना समोर रस्त्यावर ही रोकड पडलेली दिसली. त्यांना चलनाच्या बंडलावरील सीलवरून ही रक्कम बँक ऑफ महाराष्ट्र शाखेची असल्याचे निदर्शनास आले. रोकड गहाळ झालेले कदाचित माघारी परत येतील म्हणून जाधव यांनी सदरची रोकड जवळ घेऊन त्याच ठिकाणी थोडावेळ थांबून त्यांची प्रतीक्षा केली.

दरम्यान शिवारे येथे गेल्यानंतर बॅगेची चेन निघाल्याचे तसेच रोकड बंडल गळून पडल्याचे संबधीत बँक कर्मचार्‍यांच्या लक्षात आले. त्यावेळी दुचाकी वळवून ते माघारी फिरले. रस्त्यावर पडलेल्या रोकडचा शोध घेत आणि चौकशी करीत कापशी आणि त्यानंतर वडगांवच्या दिशेने निघाले. यावेळी जमादार मठानजीक प्रतीक्षा करीत थांबलेल्या संजय जाधव यांच्याकडे त्यांनी चौकशी केली. यावेळी कर्मचाऱ्यांचा घाबरलेला स्वर आणि चेहऱ्यावरील चिंता स्पष्टपणे ओळखून जाधव यांनी सापडलेली १ लाख रुपयांची रक्कम गोंधळलेल्या संबंधित बँक कर्मचाऱ्यांच्या हवाली केली. जाधव यांच्या रूपाने आम्हाला देवच भेटल्याचा साक्षात्कार झाल्याचे भाव प्रकट करणाऱ्या या दोन्ही कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आणि जाधव यांचे मनोमन आभार मानून मालेवाडी शाखेचा रस्ता धरला. संजय जाधव (वारूळकर) या एका सामान्य तरुणाने दाखविलेल्या या उदात्त प्रामाणिकपणाचे परिसरात तोंडभरून कौतुक होत आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news