बाप-लेकाला हिरावले; माय-लेकीचे अवसान गळाले .. आता जगायचं तरी कुणासाठी?

बाप-लेकाचा मृत्यू
बाप-लेकाचा मृत्यू

फलटण; पोपट मिंड :  नव्याने लागलेली नोकरी, सुनबाई आणण्याची गोड स्वप्नं, रुळावर आलेले अर्थकारण अशा आनंदी व खेळकर कुटुंबातील जीवाभावाची माणसं एका रात्रीच्या काळोखात गुडूप झाली. पोतेकर कुटुंबाचा पहाडासाखा आधार असलेल्या बाप -लेकाला नियतीने हिरावून नेल्याने कुटुंबाची वाताहत झाली. गोडधोड पुरण पोळीच्या जेवणानंतर घेतलेला घरगुती काढा या कुटुंबाच्या विनाशाला कारणीभूत ठरल्याचेच प्रथमदर्शनी समोर आले आहे. या कुटुंबातील उरलेली माय-लेक अवसान गाळून बसली आहे. आता जगायचं तरी कशासाठी अन् कुणासाठी? या त्यांच्या प्रश्नाने सार्‍यांच्याच काळजाचा ठाव चुकत आहे.

फलटण येथील गजानन चौकात हनुमंतराव पोतेकर यांच्या छोटेखानी कुटुंबात पत्नी, मुलगा अमित, मुलगी श्रद्धा असे हे चौकोनी कुटुंब सुखा समाधानाने नांदत होते. हनुमंतराव पोतेकर भाजीपाल्याचा व्यवसाय करत होते. तर बीएसस्सी झालेला त्यांचा मुलगा अमित पुणे येथील ए. व्ही. फायनान्स कंपनीत सहा महिन्यापूर्वीच नोकरीस लागला होता. बहिण श्रद्धा हिने पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचे भागीदारीतील पोकलेन मशिनही होते. सर्व काही सुरळीत सुरू होते. सुनबाई आणण्याची गोड स्वप्नं कुटुंबीय पहात होते. सुट्टी असल्याने अमित शनिवारी पुण्याहून आला होता. त्याच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यादिवशी दुपारी त्याने मांसाहार केला होता. वडिलांचा उपवास होता. मुलगा अमित पुण्याहून आल्याने व शनिवारी उपवासाचा दिवस असल्याने रात्रीच्या जेवणासाठी पुरण पोळीचा बेत केला होता. अमित अत्यंत मनमिळावू व लाघवी होता. मित्र परिवारात तो प्रिय होता. घरी आल्यानंतर तो अनेक मित्रांशी गप्पा गोष्टी करत वेळ व्यतीत करत असे. शनिवारी रात्री दहा-साडेदहापर्यंत आपल्या मित्र परिवारात गप्पा मारत तो थांबला होता. त्याला घरच्यांनी जेवणासाठी वारंवार बोलवलं त्यावेळी तुम्ही जेऊन घ्या मी नंतर जेवतो असे त्याने सांगितले. अकरा वाजता घरी जाऊन त्याने जेवण केले. जेवणानंतर गुळ, लवंग, मिरी, दालचिनी, आले, गुळवेल आदी मिश्रणाच्या काढ्यात मध घालून अमित, वडील हनुमंतराव व बहिण श्रद्धा यांनी काढा प्यायला. काढा कडू लागल्याने व थोडा प्यायल्यावर श्रद्धाला उलटी झाल्याने तिने पूर्ण काढा पिला नाही. रात्री बारा- साडेबाराच्या दरम्यान पिता-पुत्रांना मळमळ, चक्कर उलट्याचा त्रास होऊ लागला. शेजार्‍यांनी अमितला खासगी रुग्णालयात नेले.

त्यानंतर हनुमंतराव पोतेकर यांनाही तेथेच उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी असलेल्या शिकाऊ डॉक्टरने उपचार केले, सलाईन लावले. उपचाराने त्रास कमी झाला नाही. पेशंटकडे लक्ष द्या, अशी कुटुंबीयांनी डॉक्टरांना विनवणी केली. रुग्णालयाचे मुख्य डॉक्टर उशिरापर्यंत आलेच नाहीत, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. उपचार सुरू असताना अमितने आपल्या वडिलांना विचारले 'पप्पा, तुम्हाला बरं वाटतंय का? वडील म्हणाले, मला बरं वाटतंय. तुला बरं वाटतंय का? अशी एकमेकांची दोघांनी विचारपूस केली. त्या पिता-पुत्रांना काय माहित की ही आपली शेवटचीच विचारपूस ठरेल. साधारण साडेपाच-सहाच्या दरम्यान मुख्य डॉक्टर आले. तपासणी करून वडिलांना इंजेक्शन दिले. तरीही वडील उपचारास पुरेसा प्रतिसाद देत नव्हते. त्यांचा बीपी कमी झाला. पुन्हा डॉक्टर आले, त्यांनी तपासणी केली आणि त्यांना मृत घोषित केले. नंतर अमितकडे डॉक्टरांनी मोर्चा वळवला, तो थोडाफार उपचाराला प्रतिसाद देत होता. सर्व काही ठीक होते. अमितला काही होणार नाही, असा आशावाद डॉक्टरांनी दिला होता. मात्र पंधरा मिनिटांत अमितचीही तब्येत खालावली आणि त्याचाही मृत्यू झाला. पिता-पुत्र पंधरा मिनिटांच्या अंतराने मृत्यू पावले. हसतं-खेळतं असणारे हे चौकोनी कुटुंब बघता बघता उद्ध्वस्त झाले.

अहवाल आल्यानंतरच कारण होणार स्पष्ट

अमितने मांसाहार व नंतर पुरण पोळीचे जेवण केले. नंतर काढा प्यायल्यामुळे अन्न विषबाधा झाली असे म्हणावे तर वडिलांनी मांसाहार केला नव्हता मग त्यांच्यावरही अशीच परिस्थिती का ओढवली. काढ्यामध्ये काही गफलत झाली होती का? हे कुटुंबीय काढा तर नेहमीच घेत होते. अन्नामधून विषबाधा झाली की अन्य कोणत्या कारणाने या दोघांवर विपरीत परिणाम झाला. याचे उत्तर दोघांच्याही मृत्यूचा व्हीसेरा अहवाल आल्यानंतरच समजणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news