

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी पहिल्या टप्प्यात २३०० मीटर आणि दुसऱ्या टप्प्यात ३ हजार मीटर करण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला. या धावपट्टीसाठी ६४ एकर भूसंपादन झाल्याने विस्तारीकरणाला गती देण्याचा निर्णय केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यात पुण्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारणी प्रक्रियेला गती
विकासाशी संबंधित तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याबाबत या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारणीच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी पुढील आठवड्यात कोल्हापूर विमानतळावर सुरक्षितता मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या संबंधित विभागांची मान्यता घेण्यात येणार असून, त्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची आवश्यक मान्यता मिळविण्यासाठी पाठपुरावा करू, असे आबिटकर यांनी सांगितले. या मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करता येणार आहे.
या केंद्रासाठी विमानांच्या हालचालींचा मार्ग तसेच विमाने उभी करण्याचे क्षेत्र आणि विमान ठेवण्यासाठीचे दुरुस्ती गृह या कामांची स्वतंत्रपणे प्रक्रिया केली जाणार आहे. केंद्राचे प्रस्तावित ठिकाण विमानतळाच्या तामगावच्या बाजूस असल्याने तेथे स्वतंत्र सुरक्षा प्रवेश व्यवस्था उभारावे लागेल. या प्रवेशद्वारासाठी क्ष-किरण तपासणी यंत्रासह सुरक्षा व्यवस्था, पोलीस तैनात करावे लागतील. या केंद्राच्या पायाभूत सुविधांसाठी २५ गुंठे जागा प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव विमानतळ प्राधिकरणाच्या मुख्यालयात मान्यतेसाठी सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोल्हापूर-मुंबई हवाई सेवा अधिक सक्षम करण्यासाठी मोठ्या क्षमतेच्या विमानांच्या सेवेला अनुकूल सुविधा निर्माण करण्याबाबतही आबिटकर यांनी मोहोळ यांच्याशी चर्चा केली. यासाठी धावपट्टीची लांबी, विमानांच्या हालचालींसाठीचे मार्ग, विमाने उभी करण्याची जागा तसेच संबंधित विमानांच्या प्रकारानुसार आवश्यक तांत्रिक निकष पूर्ण करावे लागणार आहेत. संबंधित विमान प्रकारांना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची आवश्यक मान्यता घेण्याची प्रक्रियाही पूर्ण करण्यात येणार आहे.
कोल्हापूर-मुंबई एअरबस सेवेसाठी प्रयत्न
कोल्हापूर-मुंबई हवाई सेवा अधिक सक्षम करण्याचा निर्णय झाला. याकरीता या मार्गावर एअरबस सेवेसाठीही प्रयत्न केला जाईल, असे बैठकीत सांगण्यात आले. त्यानुसार आवश्यक ती मान्यता घेण्याची प्रक्रियाही पूर्ण करावी लागणार आहे.