कोल्हापूर: खिंडी व्हरवडे येथील महिलेचा सर्पदंशाने मृत्यू

कोल्हापूर: खिंडी व्हरवडे येथील महिलेचा सर्पदंशाने मृत्यू
Published on
Updated on

गुडाळ; पुढारी वृत्तसेवा : शेतीपंपासाठी रात्री पाणी पुरवठ्याचा फेर असल्यामुळे पती आणि मुलासह रात्री उसाची लागण करीत असताना सर्पदंश होऊन रेखा सुरेश खांडेकर (वय ४४ ) या शेतकरी महिलेचा हृदयद्रावक मृत्यू झाला. ही दुर्घटना जागतिक महिला दिनाच्या पूर्व रात्री खिंडी व्हरवडे (ता. राधानगरी) येथे गुरुवारी घडली.

दरम्यान, शेतीला पाण्यासाठी रात्रीच्या वीजपुरवठ्याच्या धोरणाचा हा बळी असून रात्रीचा वीज पुरवठा करून शासन शेतकऱ्यांचे आणखी किती बळी घेणार? असा संतप्त सवाल खिंडी व्हरवडे ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. खांडेकर कुटुंबीयांवर झालेल्या या आघातामुळे खिंडी व्हरवडे तसेच रेखा यांचे माहेर असलेल्या गुडाळ गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुरेश दिनकर खांडेकर हे अल्पभूधारक शेतकरी असून शेती आणि वडाप व्यवसायावर कुटुंबाची उपजीविका करतात. त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे. तर दुसरी मुलगी आणि एक मुलगा शिकत आहे.

गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास ऊस लावण करताना रेखा यांना तळपायाजवळ काहीतरी ओरबडल्याचे जाणवले. पती सुरेश यांनी रेखा यांचा चिखलाने माखलेला तळपाय धुतला असता काहीतरी ओरबडल्याची जखम दिसून आली. पायाला काच वगैरे लागली असेल, असे समजून रेखा यांनी पुन्हा लावण करण्यास सुरुवात केली. सरीतून काही अंतर पुढे गेल्यानंतर त्यांनी चक्कर येत असल्याचे पती सुरेश यांना सांगितले. त्यानंतर मुलगा ओम याने दुचाकीवरून रेखा यांना गावातील डॉक्टरकडे नेले. परंतु रक्तदाब कमी झाल्याने त्यांना राधानगरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

वैद्यकीय अधिकारी डॉ. गवळी यांनी रेखा यांची सर्पदंशाची लक्षणे ओळखून तातडीने सर्पदंश प्रतिबंधक लस देऊन इतर प्राथमिक उपचार केले. मात्र, त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना ऑक्सिजन लावून रुग्णवाहिकेतून कोल्हापूरला सीपीआर येथे पाठवण्यात आले. परंतु प्रकृती चिंताजनक होऊन अखेर रेखा यांचा उपचारापूर्वीच हृदयद्रावक मृत्यू झाला. त्यावेळी सोबत असलेले पती सुरेश आणि मुलगा ओम यांनी हंबरडा फोडला. आज पहाटे मृतदेहावर खिंडी व्हरवडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news