कोल्हापूर : नैसर्गिक पद्धतीने काथ बनविण्याचे संशोधन | पुढारी

कोल्हापूर : नैसर्गिक पद्धतीने काथ बनविण्याचे संशोधन

कोल्हापूर : प्रवीण मस्के :  कोकणासह इतर ठिकाणी काही प्रमाणात सुपारीच्या सालीपासून काथ केमिकल पद्धतीने बनवला जातो; मात्र शिवाजी विद्यापीठ तंत्रज्ञान अधिविभागातील गायत्री गोखले हिने संशोधन करून नवीन पर्यावरणपूरक पद्धतीने व शेतकऱ्याच्या शेतातील साधने वापरून काथ बनवला आहे. या संशोधनामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जास्त फायदा होऊ शकतो.

गायत्री गोखले ही मूळची आचरा (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील आहे. ती शिवाजी विद्यापीठ तंत्रज्ञान अधिविभागात बी. टेक. (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) तृतीय वर्षात शिकत आहे.  तिने सुपारीच्या सालापासून काथ बनवण्याच्या नैसर्गिक पद्धतीवर संशोधन केले आहे. त्यामध्ये सुपारीच्या काथाची निर्मिती नैसर्गिक घटक पाणी, माती, शेण वापरून केली आहे. कोकण नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध प्रदेश आहे. येथे आंबा, फणस, नारळ, सुपारी यासारखी अनेक पिके घेतली जातात. त्यामधील सुपारी हे प्रमुख पीक आहे. ज्याप्रकारे नारळाच्या काथ्याचे अनेक उपयोग आहेत, त्याच प्रकारे सुपारीचा काथ अनेक ठिकाणी वापरला जाऊ शकतो. कोकणातील लोक सुपारीची साल जाळून टाकतात. त्यापेक्षा त्याच्या काथ बनवल्यास उत्पन्नाचे साधन होऊ शकते.

कोल्हापूर : पर्यावरणपूरक पद्धतीने…

सध्या काही प्रमाणात सुपारीचा काथ केमिकल पद्धतीने बनवला जातो. संशोधन केलेल्या नवीन पद्धतीत पर्यावरणपूरक पद्धतीने व शेतकऱ्याच्या शेतातील साधने वापरून काथ बनवला आहे. याचा वापर करून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. यासंदर्भात जानेवारी २०२३ मध्ये पेटंटसाठी ऑनलाईन प्रस्ताव पाठवला होता. जून महिन्यात यास आंतरराष्ट्रीय स्तरावरील साऊथ आफ्रिकेन पेटंट मिळाले आहे. संशोधन कार्यात कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही एन शिंदे, तंत्रज्ञान अधिविभाग प्रमुख डॉ. एस. एन. सपली यांच्यासह डॉ. महेश गोखले, डॉ. निरंजना चव्हाण, डॉ. संतोष मधाळे, डॉ. अजित तेलवे, डॉ. प्रिया पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्याथ्यनि एक तरी पेटंट करण्याचा प्रयत्न करावा. पेटंटच्या माध्यमातून एखादा उद्योगदेखील उभा राहू शकतो. याची दखल घेऊन शिवाजी विद्यापीठात पेटंट दूत म्हणून काम करण्याची संधी मिळाली. नैसर्गिक पद्धतीने काथ बनविण्याबाबत अधिकचे संशोधन सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी काहीतरी
चांगले करण्याचा मानस आहे. – गायत्री गोखले, (संशोधक विद्यर्थिनी)

हेही वाचा 

Back to top button