कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : साईक्स एक्सटेंशन परिसरात पिसाळलेला माकडाला अग्निशमन विभाग व वन विभागाच्या वतीने पकडण्यात आले. गुरुवारपासून राजारामपुरी परिसरात एक माकड नागरिकांच्या अंगावर धावून येत होते. याबाबत अग्निशमन विभागाला फोन आल्यानंतर तातडीने त्याला पकडण्यासाठी जवान गेले होते. रात्री या माकडाला पकडण्याचा प्रयत्न अग्निशमन विभागाच्या वतीने करण्यात आला होता. परंतु, अंधार असल्याने त्याला पकडता आले नाही.
आज सकाळी साईक्स एक्सटेन्शन या परिसरात एका नागरिकाला पिसाळलेले माकड चावले असल्याचा फोन अग्निशमन विभागाला आला. यावेळी अग्निशमन विभागाने तत्काळ या ठिकाणी गाडी पाठवून त्या माकडाला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी या पिसाळलेल्या माकडाला अग्निशमन विभाग व वन विभाग यांनी थँक्यू लायझरचे इंजेक्शनद्वारे व जाळीच्या साह्याने या माकडाला पकडले. यानंतर त्याला सुखरूप दाजीपूर अभयारण्यात सोडण्यासाठी नेण्यात आले.
या मोहिमेत महानगरपालिका अग्निशमन विभागातील स्थानक अधिकारी जयवंत खोत, वाहन चालक नवनाथ साबळे, फायरमन प्रमोद मोरे, संभाजी ढेपले, वन विभागाचे अमोल चव्हाण, विनायक माळी, प्रदीप सुतार, पथक प्रमुख बांगी, माजी उपमहापौर संजय मोहिते, इचलकरंजी वन्य जीव संरक्षक संस्था आदींंनी भाग घेतला.
हेही वाचा