कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : आराध्याचं वय अवघ ३ वर्षे १० महिने पण याच वयात सारे कोल्हापूर चकित होऊन जातील अशी आपल्या अंगातील तिने धमक दाखवून दिली. रेडयाची टक्कर येथील वि. स. खांडेकर स्केटिंग ट्रॅकवर तब्बल ६ किलोमीटर अंतर होईल, असे ७२ राऊंड मारत भारतात नव्या विक्रमांची नोंद केली. अतिशय अवघड असलेल्या प्रोफेशनल इनलाईन स्केटिंगचा वापर करत तिने या विक्रमाला गवसणी घातली. हा विक्रम रचण्यासाठी तिने ४१ मिनिटांची वेळ घेतली. आराध्या पद्मराज पाटील असे या नवा विक्रम करणाऱ्या चिमुकलीचे नाव आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून स्केटिंगचे धडे घेतलेल्या आराध्याला विक्रम म्हणजे काय याची पुसटशीही माहिती नाही. सध्या प्ले ग्रुपमध्ये शिक्षण घेत असलेल्या आराध्याला आई श्रीदेवी व वडील पद्मराज पाटील यांनी प्रोत्साहित करून स्केटिंग ट्रॅकवरून मोठे अंतर गाठायचे आहे, असे समजावून सांगितले. तिनेही सकारात्मक प्रतिसाद देत एस. के. रोलर स्केटिंग अॅकॅडमीचे प्रशिक्षक सुहास कारेकर यांनी दिलेल्या टिप्स नुसार स्केटिंगचा सराव सुरु केला. दोन महिने मोठा पल्ल्या गाठण्याची धमक आराध्यामध्ये निर्माण झाल्यानंतर आई-वडील व प्रशिक्षकांनी आराध्याच्या विक्रमांचे पंधरा दिवसांपूर्वी नियोजन केले होते.
१० दिवसांपूर्वी पासून जोमाने सराव करुन आराध्या ही विक्रमासाठी सज्ज झाली होती. तिने गुरुवारी सायंकाळी ६ किलोमीटर अंतर पूर्ण होईल, इतके स्केटिंग करून देशात नवा विक्रम रचला. सायंकाळी साडे सहा वाजता तिने प्रोफेशनल इनलाईन स्केटिंग पायात घालून स्केटिंग करण्याला सुरुवात केली. यावेळी पाऊसास सुरुवात झाली, तरीही न थांबता तिने सहा किलोमीटरचे अंतर ४१ मिनिटांत पूर्ण करत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी पालक वर्ग आराध्याला उभ्या पावसात प्रोत्साहीत करण्यासाठी थांबले होते. आराध्याच्या या रेकॉर्डचे परिक्षण ग्लोबल जिनिअस रेकॉर्डचे सचिव संजय शंकरराव जाधव यांनी केले.
विक्रम पूर्ण होताच प्रशिक्षक सुहास कारेकर यांना आनंदाश्रु अनावर झाले, त्यांनी आराध्याला खांदयावर घेऊन तिचे कौतुक केले. तसेच आराध्याची मोठी बहिण गुजन ही रेकॉर्ड पूर्ण होईपर्यंत आराध्याला सतत प्रोत्साहन देत होती. अनेकांनी आराध्याला कडेवर घेऊन सेल्फीही घेतले. फटाकांची आतषबाजीही करुन तीचे कोडकौतुकही केले.
यानंतर आराध्याचा नानस्टॉप ६ किलो मीटर स्केटिंगचा देशात विक्रम झाल्याची घोषणा ग्लोबल जिनिअस रेकॉर्डचे सचिव श्री. संजय शंकरराव जाधव यांनी केल्यानंतर आमदार जयश्री जाधव व सत्यजित जाधव यांच्या हस्ते तिला ग्लोबल जिनिअर्स रेकॉर्डतर्फे ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. श्री. संजय जाधव यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पदक देण्यात आले. यावेळी एस. के. रोलर स्केटिंग अॅकॅडमीचे अध्यक्ष भुपाल शेटे, भारतीय जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील, आदी उपस्थित होते.