मुरगूड: पुढारी वृत्तसेवा : ग्रामदैवत अंबाबाईचे मंदिर हे मुरगुडच्या आध्यात्मिक व धार्मिक परंपरेचे श्रद्धास्थान बनेल. मुरगुडचा सामाजिक व धार्मिक एकोपा या मंदिराच्या निमित्ताने अनुभवला. तो असाच कायम टिकावा, अशी भावना खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केली. आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत अंबाबाई मंदिराचा कलशारोहण सोहळा संपन्न झाला. ग्रामदैवत अंबाबाई देवालयाच्या प्रसाद वास्तू प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण आनंद सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रवचनकार श्रीकृष्ण देशमुख होते. व्यासपीठावर आमदार हसन मुश्रीफ, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे, कार्याध्यक्ष प्रवीणसिंह पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, दीर्घकाळानंतर अंबाबाई मंदिर पूर्णत्वास आल्याने सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय. असे मंदिर जिल्हयातील दुर्मिळ मंदिर असून मुरगूडचे वैभव वाढविणारे आहे. त्यामुळे येथे पर्यटक सुध्दा येतील. शासनाचा निधी सत्कारणी लागल्याचे आज समाधान मिळत आहे. हा लोकोत्सव कौतुकाचा सोहळा आनंद देणारा आहे.
अंबाबाईचे हेमाडपंथी मंदिर १४ वर्षांनी पूर्णत्वास आले. दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धाराची कोनशिला बसविली आणि आज माझ्या उपस्थितीत मंदिराच्या कलशारोहणाचा कार्यक्रम झाला. हे आपले भाग्य आहे, असे गौरवाद्गगार जीर्णोद्धार समितीचे कार्याध्यक्ष व खासदार संजय मंडलिक यांनी काढले.
याप्रसंगी श्री क्षेत्र आडीचे परमपूज्य राजीवजी महाराज यांच्या हस्ते मुख्य कलशारोहण करण्यात आले. माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मंदिराचे आर्किटेक्ट निरंजन वायचळ, ठेकेदार कळके, विलास सुतार, भूते बंधू आदींचा डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी विरेंद्र मंडलिक, वैशाली मंडलिक, सायरा मुश्रीफ, सुहासिनीदेवी पाटील, संजना मंडलिक, दिग्विजय पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. अविनाश चौगले यांनी सूत्रसंचालन केले. तर माजी नगराध्यक्ष नामदेव मेंडके यांनी आभार मानले.
हेही वाचलंत का ?