

कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा पावसाचा जोर नसला तरी कळंबा तलाव शनिवारी दुपारी पूर्ण क्षमतेने भरला. यानंतर धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. ही माहिती मिळाल्यानंतर ओसंडून वाहणारा कळंबा पाहण्यासाठी नागरिकांची तलावावर गर्दी झाली होती. दरम्यान, शनिवारी पंचगंगा नदीवरील शिंगणापूर बंधाराही खुला झाला. राजाराम बंधार्यावर केवळ तीन ते चार इंच पाणी होते. रात्री उशिरा हा बंधाराही खुला होण्याची शक्यता आहे.
जुलैच्या दुसर्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने कळंबा तलावातील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली होती. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. मात्र, पाणी पातळीत वाढ होतच राहिली. गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने पूर्ण उघडीप दिली. यामुळे संथगतीने पाणी पातळी वाढत होती.
शुक्रवारीच कळंबा काठोकाठ भरला होता. शनिवारी सकाळपासून तलावाच्या सांडव्यावरून वार्याच्या हेलकाव्याने पाणी खाली पडत होते. दुपारी दोन-अडीचच्या सुमारास सांडव्यावरून पाणी वाहू लागले. सांडव्यावरून कोसळणार्या पाण्याचा जोर कमी असल्याने सांडव्याखाली आबालवृद्धांची मोठी गर्दी झाली होती.
जिल्ह्यात आजही पावसाने पूर्ण उघडीप दिली. अधूनमधून कोसळणारी एखादी सर वगळता अनेकदा कडकडीत ऊनही पडत होते. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी अवघ्या 1.9 मि.मी.इतक्या कमी पावसाची नोंद झाली आहे. नद्यांच्या पातळीतही घट होत आहे. पंचगंगेवरील शिंगणापूर बंधारा खुला झाला. राजाराम बंधार्यावरही रात्री आठ वाजता तीन ते चार इंच पाणी होते. रात्री उशिरा या बंधार्यावरील पाणीही पूर्णपणे ओसरेल अशी शक्यता आहे. धरण क्षेत्रातील पावसाचाही जोर पूर्णपणे कमी झाला आहे. जिल्ह्यातील प्रमुख 15 पैकी 10 धरणांतून विसर्ग सुरू आहे.
हेही वाचा