

हुपरी, पुढारी वृत्तसेवा : केंद्र व राज्य सरकारने पोकळ आश्वासने व बोलघेवड्या योजनांच्या नावाखाली सामान्य माणसाची पुरती दिशाभूल केली आहे. मोठमोठ्या घोषणा आणि त्यात पोकळ गाभा हेच या सरकाराचे उद्दिष्ट राहिले आहे. जनमानसांच्या जीवाशी खेळ करण्याचे काम सध्या देशात सुरू आहे. त्यामुळे जनतेचे रोजचे जगणे मुश्कील झाले आहे, अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी केली. हुपरी (ता. हातकणंगले) येथे आयोजित 'होऊ द्या चर्चा' अभियानात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव होते. (Jyoti Thackeray)
हवेतल्या घोषणांनी भावनिक राजकारण करून सत्तेवर आलेल्या सरकारने नुसतेच इव्हेंट मॅनेजमेंट करण्याचे लक्ष ठेवले आहे. अरबी समुद्रात शिवस्मारक व इंदू मिल येथे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचा भावनिक कार्यक्रम करून आजही त्याबद्दल सरकार ब्र काढायला तयार नाही. शेतमालाला भाव मिळत नाही, खते- बियाणे यांची सर्वत्र वानवा आहे. जीएसटी च्या नावाखाली उद्योग धंदे मोडकळीस आले आहेत. त्यामुळे होऊ द्या चर्चा कार्यक्रमातून सरकारला जनतेच्या साक्षीने जाब विचारण्यासाठी आपण येथे उपस्थित असल्याची भावना ठाकरे यांनी व्यक्त केली. (Jyoti Thackeray)
यावेळी माजी आमदार सुजित मिणचेकर, उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान, तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, युवासेना जिल्हा अधिकारी स्वप्नील मगदूम, भरत देसाई, राजेंद्र पाटील, रघुनाथ नलवडे, मीना जाधव, विनायक विभूते, बाळासाहेब मुधाळे, पूनम पाटील, शिवाजी जाधव, अर्जुन जाधव, अरुण गायकवाड, भरत मेथे आदीसह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा