

Jotiba temple in kolhapur food safety raid:
कोल्हापूर: दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या नावानं चांगभलं...च्या गजरात श्रावण षष्ठीनिमित्त डोंगरावर जमलेल्या लाखो भाविकांच्या आरोग्याशी गंभीर खेळ उघडकीस आला आहे. यात्रेचा फायदा घेत काही व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला तब्बल ४०० किलो बनावट आणि भेसळयुक्त पेढा, बर्फी आणि हलवा अन्न व औषध प्रशासनाने (FDA) जप्त केला आहे. स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांच्या सतर्कतेमुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे भेसळीचा प्रकार उघडकीस
जोतिबा डोंगरावर चोपडाई देवीच्या श्रावण षष्ठी यात्रेनिमित्त मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीत काही व्यापारी राजरोसपणे १०० रुपये पावशेर दराने पेढा आणि बर्फी विकत होते. मात्र, या मिठाईच्या दर्जाबाबत माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे आणि ग्रामपंचायत अधिकारी विठ्ठल भोगण यांना संशय आला. त्यांनी तात्काळ अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याची माहिती दिली.
माहिती मिळताच FDA च्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केली असता, विक्रीसाठी ठेवलेला माल अत्यंत निकृष्ट दर्जाचा आणि भेसळयुक्त असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. प्रशासनाने तात्काळ कारवाई करत सदाशिव वारेकर, गणेश वारेकर, पोपट वारेकर आणि फारुक वजरवाड यांच्याकडून माल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये सुमारे ४०० किलो बनावट पेढा, बर्फी आणि स्वीट हलवा आहे. या मालाची अंदाजे एक लाख रुपये इतकी आहे. चौकशीत हा माल सांगली जिल्ह्यातील डफळापूर येथील उत्तम शिंदे याच्याकडून खरेदी केल्याचे समोर आले आहे.
प्रशासनाने जप्त केलेला सर्व माल ग्रामपंचायत कार्यालयात आणला. तेथे रीतसर पंचनामा करून तो ट्रॉलीमध्ये भरण्यात आला आणि डंपिंग ग्राऊंडवर नेऊन नष्ट करण्यात आला, जेणेकरून तो पुन्हा विक्रीसाठी वापरला जाणार नाही.
या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अन्न व औषध प्रशासनाला कडक आदेश दिले आहेत. यात्रेच्या परिसरातील सर्व मिठाई दुकानांची तपासणी करून पेढे, बर्फी आणि खव्याचे नमुने तात्काळ तपासणीसाठी पाठवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. या कारवाईमुळे भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले असून, प्रशासनाच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे.