Jotiba Temple Development : ‘जोतिबा’ विकासाच्या नावानं चांगभलं...

पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात; जोतिबा मंदिर विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता
Administrative recognition of Jotiba Temple Development Plan
Jotiba Temple Development : ‘जोतिबा’ विकासाच्या नावानं चांगभलं...Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या मंदिर परिसर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील 259 कोटींच्या कामांना बुधवारी राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. यामुळे विकास आराखड्याचा मार्ग मोकळा झाला असून, तो राबविण्याची कार्यवाही सुरू होणार आहे. कामांचे सूक्ष्म आराखडे, तांत्रिक मान्यता, निविदा आदी प्रक्रिया पूर्ण करून पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईसाठी 1,445 कोटी 97 लाख रुपयांच्या, तर दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या पहिल्या टप्प्यातील 259 कोटी 59 लाख रुपयांच्या विकास आराखड्याला चौंडी (जि. अहिल्यानगर) येथे दि. 6 मे रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. यानंतर जोतिबा मंदिर विकास आराखड्याला बुधवारी राज्याच्या नियोजन विभागाने प्रशासकीय मान्यता दिली. यामुळे 259 कोटी 59 लाख रुपयांच्या आराखड्यासाठी निधी मिळणार असून, या आराखड्याची अंमलबजावणी सुरू करता येणार आहे.

प्रशासकीय मान्यता दिलेल्या 259.59 कोटी किमतीच्या कामांच्या विकास आराखड्यापैकी 81 कोटी 60 लाख रुपयांची कामे नियोजन विभागामार्फत करण्यात येणार आहेत. उर्वरित कामे त्या त्या विभागातून केली जाणार आहेत. या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना ‘संनियंत्रण अधिकारी’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार या आराखड्यातील तांत्रिक मान्यतेसह ज्या कामांना वनसंवर्धन कायदा, 1980, पर्यावरण (संरक्षण) कायदा, 1986 तसेच प्राचीन स्मारके आणि पुरातत्त्व स्थळ आणि अवशेष कायदा, 1958 अंतर्गत आवश्यक त्या सर्व परवानगी संबंधित केंद्र व राज्य शासनाच्या विभागाकडून घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकार्‍यांची राहणार आहे.

या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती, तर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आराखड्याशी संबंधित सर्व अंमलबजावणी व कार्यान्वयीन यंत्रणांच्या जिल्हाप्रमुखांचा समावेश असलेली जिल्हास्तरीय तांत्रिक समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीची प्रत्येक महिन्यात एक बैठक घेतली जाणार आहे. ही कामे करताना ऐतिहासिक वास्तूंची मूळ शैली जपण्याचे, तसेच पुरातत्त्वीय जाण असलेल्या संस्थांकडून (भारतीय पुरातत्त्व विभाग, तसेच राज्य पुरातत्त्वीय विभाग) कामे करून घ्यावीत, असेही या आदेशात म्हटले आहे.

81 कोटी 60 लाखांची कामे नियोजन विभागातून होणार

या आराखड्यातील श्री जोतिबा मंदिर संवर्धन व दुरुस्ती करणे (55 कोटी) व यमाई मंदिर संवर्धन व दुरुस्ती करणे (25 कोटी) ही दोन कामे आणि या कामांकरिता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार शुल्क 1 कोटी 60 लाख अशी एकूण 81 कोटी 60 लाखांची कामे नियोजन विभागातून होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news