

कोल्हापूर : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या मंदिराचे मूळ सौंदर्य भाविकांना दिसणार आहे. मंदिराभोवती विविध कारणांनी वाढत गेलेला तीन फुटांचा थर काढला जाणार असून मंदिर पूर्वीप्रमाणे 72 फूट उंचीचे होणार आहे. श्री क्षेत्र जोतिबा मंदिर विकास आराखड्यांतर्गत जोतिबा मंदिर आणि यमाई मंदिराच्या संवर्धनाचा 80 कोटींचा आराखडा तयार झाला आहे. हा आराखडा तांत्रिक मान्यतेसाठी पुरातत्त्व विभागाला सादर करण्यात आला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या 6 मे रोजी झालेल्या बैठकीत श्री क्षेत्र जोतिबा मंदिर विकास आराखड्याच्या 259 कोटी 59 लाख रुपयांच्या पहिल्या टप्प्याला मान्यता देण्यात आली. यानंतर दि. 28 मे रोजी या आराखड्याला नियोजन विभागाने प्रशासकीय मान्यता दिली. यानंतर जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यातील कामाला प्रारंभ करण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावानुसार नव्याने अंतिम आराखडे तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली.
पहिल्या टप्प्यात जोतिबा आणि यमाई मंदिराच्या संवर्धनाचे काम केले जाणार आहे. याकरिता जोतिबा मंदिराचा 55 कोटींचा, तर यमाई मंदिराचा 25 कोटींचा असा एकूण 80 कोटींचा अंतिम आराखडा पुरातत्त्व विभागाने नियुक्त केलेल्या सल्लागार कंपनीने पूर्ण केला आहे. हा आराखडा तांत्रिक मान्यतेसाठी पुरातत्त्व विभागाला सादर केला आहे. या आराखड्यानुसार जोतिबा मंदिराला मूळ स्थिती प्राप्त करून दिली जाणार आहे. मंदिरात नव्याने झालेली बहुतांश सिमेंट -क्राँकीटची कामे काढून टाकली जाणार आहेत. मंदिरात केलेले काही भागाचे रंगकामही काढण्यात येणार आहे.
दरम्यान, जोतिबा आणि यमाई मंदिर सोडून पहिल्या टप्प्यातील अन्य 179 कोटी 59 लाख रुपयांच्या कामांच्या आराखड्यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. आराखड्यासाठी झालेल्या स्पर्धेतील तीन विजेत्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा सादरीकरण झाले. त्यातून एका कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीने डोंगरावर येणार्या पायवटांचे संवर्धन आणि सुशोभीकरण, डोंगरावरील कड्यांचे संवर्धन, दोन ठिकाणी ज्योत स्तंभ उभारणे, केदार गार्डन व चाफेवन उभारणे, तीन तलावांचे संवर्धन व सुशोभीकरण, अंगारकर वाडा आणि बाब यांचे संवर्धन, पाणपोई व शौचालय आणि पार्किंग व्यवस्था या कामांचे आराखडे तयार करण्यास सुरुवात केली आहे. हे आराखडे महिनाभरात सादर करावेत, अशी सूचना प्रशासनाने दिली आहे.