कोल्हापूर : काँग्रेसमधील इच्छुकांच्या मुलाखती झाल्यानंतर सर्वांनी एकजुटीने पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला. सामान्य कार्यकर्ता म्हणून राजेश लाटकर यांना उमेदवारी दिल्यानंतर आम्ही त्यांचा प्रचार करण्याचे ठरविले; परंतु चोवीस तासांत अशी सूत्रे फिरली की लाटकर यांची उमेदवारी रद्द करून मधुरिमाराजे यांना उमेदवारी मिळाली. ही उमेदवारी देताना कोल्हापूर उत्तरच्या विद्यमान आमदार म्हणून काँग्रेस नेत्यांनी आपल्याला विश्वासात घेतले नाही किंवा कसली चर्चाही केली नाही, असा आरोप आ. जयश्री जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, काँग्रेसने डावलल्याने आपल्या राजकारणाला पूर्णविराम लागणार असल्याने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याचेही त्यांनी सांगितले.
आ. जाधव म्हणाल्या, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी महिन्यापूर्वीच तुम्हाला उमेदवारी मिळणार नाही, असे सांगितले होते. मात्र, विद्यमान आमदार म्हणून मी उमेदवारीसाठी मुलाखत दिली होती. कारण मला आमदार म्हणून फक्त दोन-अडीच वर्षांचा कालावधी मिळाला. अद्याप अनेक विकासकामे करायची आहेत. काँग्रेसची उमेदवारी मधुरिमाराजे यांना जाहीर झाल्यानंतर फक्त अर्ज भरण्यासाठी या म्हणून फोन आला.
आ. जाधव म्हणाल्या, केंद्रात भाजपची सत्ता आहे. निवडणुकीनंतर राज्यातही महायुतीची सत्ता येईल. आम्हाला पुढील पाच वर्षे समाजकारण करायचे आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागणार आहे. त्यामुळे समर्थक व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, माजी खा. संजय मंडलिक यांनी आ. जाधव यांच्या शिवसेना प्रवेशाने जिल्ह्यातील पक्षाला बळकटी येणार आहे. महिला आघाडीची त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. येत्या काळात काँग्रेसचे आणखी काही नेते, कार्यकर्ते पक्षात येणार आहेत, असेही सांगितले. यावेळी उद्योजक सत्यजित जाधव उपस्थित होते.
आ. जाधव यांनी कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचा प्रचार करणार असल्याचे सांगितले. कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेनेचे राजेश क्षीरसागर अन् दक्षिणमध्ये भाजपचे अमल महाडिक यांचा प्रचार करणार आहे. क्षीरसागर व महाडिक यांच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. यापुढे आमचे सर्व समर्थक व कार्यकर्ते महायुतीसाठी रणांगणात उतरतील, असेही आ. जाधव यांनी सांगितले.