मुंबई : भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असताना महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा कायम आहे. आघाडीत 260 जागांचे वाटप पूर्ण झाले असले, तरी 28 जागांवरील पेच सुटलेला नाही. शनिवारी यावर सुमारे अकरा तास ‘मविआ’च्या प्रमुख नेत्यांची चर्चा होऊनही त्यावर तोडगा निघाला नाही. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन शरद पवारांशीही चर्चा केली. तरीसुद्धा हा तिढा कायम आहे. (Maharashtra Assembly Election)
रविवारी काँग्रेसचे राज्यातील नेते जागावाटपावर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत दाखल झाले. मात्र, त्यांची बैठक होऊ शकली नाही. आता ही बैठक सोमवारी होणार आहे. यानंतर काँग्रेसचे नेते राज्यात परततील आणि उर्वरित जागांवर तोडगा काढण्याचे प्रयत्न होतील
विदर्भातील आरमोरी, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चिमूर, बल्लारपूर, रामटेक, कामठी, दक्षिण नागपूर, भद्रावती-वरोरा या दहा जागांवर उद्धव ठाकरे यांनी दावा सांगितला आहे. सोबत चंद्रपूर आणि अहेरी या जागा शरद पवार गटाला हव्या आहेत. विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही विदर्भात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. त्यामुळे तेथे जादा जागा मिळाव्यात म्हणून काँग्रेस आग्रही आहे.
‘मविआ’त वाद असलेल्या या जागांपैकी भद्रावती वरोरा ही जागा काँग्रेसची आहे. येथे काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या आमदार होत्या. त्या लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. आरमोरी, गडचिरोली, चिमूर, बल्लारपूर, कामठी, दक्षिण नागपूर या सहा मतदारसंघांत सध्या भाजपचे आमदार आहेत. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर या तीन मतदारसंघांत अपक्ष आमदार आहेत. रामटेक मतदारसंघात शिंदे सेनेचा आमदार आहे. अहेरी मतदारसंघात अजित पवार गटाचा आमदार आहे. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी हवी आहे. अहेरीमध्ये अजित पवार गटाचे आमदार धर्मराव आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार गटात प्रवेश केला असून, त्यांना हा मतदारसंघ हवा आहे. (Maharashtra Assembly Election)
काँग्रेसचे नेते दिल्लीला गेले असताना मुंबईत उद्धव ठाकरे यांचे विश्वासू नेते संजय राऊत आणि अनिल देसाई यांनी शरद पवार यांची भेट घेऊन जागावाटपावर चर्चा केली. आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांनीही पवारांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे भेट घेतली. ‘मविआ’त योग्य समन्वय आहे. आमच्यात कोणतेही वाद नाहीत. जागा वाटपावर लवकरच अंतिम तोडगा निघेल, असे राऊत यांनी या भेटीबाबत बोलताना स्पष्ट केले.