उमेश काळे
Maharashtra Assembly Polls | मराठवाड्यातील 46 मतदारसंघांत होणार्या विधानसभा निवडणुकीसाठी बहुतेक प्रमुख पक्षांनी उमेदवार घोषणेची प्रक्रिया जवळपास पूर्ण केली आहे. औरंगाबाद (मध्य) मतदारसंघात ‘उबाठा’ने किशनचंद तनवाणी यांची उमेदवारी घोषित केली होती. परंतु, या मतदारसंघात ‘एमआयएम’ने उमेदवार घोषित केल्यामुळे हिंदू मतांचे विभाजन होईल व त्याचा फायदा ‘एमआयएम’ला होणार असल्याची भीती व्यक्त करीत तनवाणी यांनी अर्ज भरण्यापूर्वीच उमेदवारी मागे घेतल्याने ‘उबाठा’ला धक्का बसला आहे.
औरंगाबाद पश्चिममध्ये माजी शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांच्या नावाची घोषणा झाली होती. त्यांना पक्षांतर्गत विरोध झाल्याने लहू शेवाळे यांना उभे करण्यात आले. ‘एमआयएम’ने पश्चिममधून इम्तियाज जलील आणि मध्य मतदारसंघात नासेर सिद्दीकी यांना तिकीट दिले आहे. कालपर्यंत भाजपचे काम करीत असलेल्या रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश करून कन्नडची उमेदवारी मिळविली. त्यांच्याविरोधात त्यांचे पती हर्षवर्धन जाधव (विभक्त राहतात) आणि ‘उबाठा’चे उदयसिंह राजपूत आहेत. घनसावंगी मतदारसंघात माजी मंत्री राजेश टोपे यांच्या विरोधात शिंदे गटाने डॉ. हिकमत उढाण यांचे नामांकन आहे. परभणीची जागा शिंदेंना सुटल्यामुळे तेथे भाजप नेते आनंद भरोसे यांनी पक्षत्याग करीत धनुष्यबाण हातात घेतले आहे. गंगाखेडची जागा भाजपने मित्रपक्ष ‘रासप’ला सोडली आहे. विद्यमान आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे हे ‘रासप’चे उमेदवार आहेत. तुळजापुरात ज्येष्ठ काँग्रेस नेते मधुकरराव चव्हाण उमेदवारी न मिळाल्याने आक्रमक आहेत. निलंगा, बीड, धाराशिव, परंडा, पैठण, अहदपूर, तुळजापूर, बीड, गेवराई, परभणी, पाथरी, जिंतूर आदी मतदासंघांत महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोरी डोकेदुखी वाढविणारी ठरली आहे.