कोल्हापूर: जगताप परिवाराने पुस्तकांची गुढी उभारुन दिला वाचन संस्कृतीचा संदेश

कोल्हापूर: जगताप परिवाराने पुस्तकांची गुढी उभारुन दिला वाचन संस्कृतीचा संदेश
Published on
Updated on

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : राज्यभरात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाहूवाडी तालुक्यातील येळाणे येथील डॉ. संजय जगताप कुटुंबाने गुढीच्या माध्यमातून एक नवा आदर्श घालून दिला आहे. गुढी ज्ञानाची…गुढी परिवर्तनाची …. वाचन संस्कृती वाढीची… असा सामाजिक संदेश त्यांनी या पुस्तकाच्या गुढीच्या माध्यमातून दिला आहे.

डॉ. संजय जगताप माण (ता. शाहूवाडी) येथे प्राथमिक शिक्षक असून त्यांनी पारंपरिक गुढी उभी न करता वेगळा विचार केला आहे. त्यांच्या या विचाराचे सगळीकडून कौतुक होत आहे. जगताप कुटुंबाने पुस्तकांची गुढी उभारून एक नवा आदर्श समाजासमोर उभा केला आहे. घरासमोर गुढी उभारुन सर्वजण आपली संस्कृती-परंपरा जपतात. त्यासोबतच पुस्तकांची गुढी उभारुन वाचन संस्कृती वाढविणे हा त्यांच्या संकल्पनेमागचा हेतू आहे.

अनेक सामाजिक उपक्रम

डॉ. संजय जगताप आणि वंदना संजय जगताप यांच्या या पुस्तकांच्या गुढीचे यंदाचे पाचवे वर्ष आहे. आमचा परिवार नेहमीच पुरोगामी विचार प्रत्यक्षात अंमलात आणत असतो. यापूर्वीही आम्ही मकर संक्रांतीच्या हळदीकुंकू कार्यक्रमाला संक्रांतीचे वाण म्हणून पारंपरिक वस्तू भेट न देता 'श्यामची आई' हे पुस्तक सर्व सुवासिनींना भेट म्हणून दिले होते, अशी प्रतिक्रिया डॉ. संजय जगताप यांनी दिली. त्याचबरोबर खंडेनवमीला पारंपरिक शस्त्राबरोबरच आधुनिक शस्त्रे म्हणजेच मोबाईल, लॅपटॉप, वही, पुस्तक, पेन यांचे पूजन केल्याचेही त्यांनी सांगितले.

अशी उभारली पुस्तकाची गुढी

घरातील विविध विषयांची पुस्तके एकावर एक ठेवून उंच गुढी उभारली, त्यावर तांब्याचा लोटा ठेवून त्याला कापड गुंडाळले. गुढीला फुलांचा हार चढवला. गुढीचे औक्षण करुन 'यशोसुत्रे' या स्वामी विवेकानंद यांच्या पुस्तकाचे प्रकट वाचन केले. तद्नंतर पुस्तकांच्या गुढीला नैवेद्य दाखवला. जगताप परिवाराने उभारलेली पुस्तकांची गुढी हा परिसरात अनेकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरला.

वाचन संस्कृती जोपासावी

पुस्तक हे केवळ शब्दसंपदा वाढवण्यास मदत करणारे साधन नसून, पुस्तक हे अनुभवांसह कल्पनांचे, आशा-आकांक्षाचे क्षितीज निर्माण करणारे एक उत्तम साधन आहे. वाचन समृद्ध असले म्हणजे लेखनाचीही प्रवृत्ती प्रबल होते, कल्पनाशक्तीला वाव मिळतो, रसिकता वाढीस लागते, सृजनशीलतेला वाट सापडते, सहृदयता, दुसर्‍याच्या दु:खाची जाणीव होते. म्हणून वाचन संस्कृती जोपासणे ही काळाची गरज आहे. गुढीच्या उंचीप्रमाणे विचारांची उंची वाढावी, युवा पिढीत वाचनाची चळवळ रुजावी, घराघरात वाचन संस्कृतीची नवी पहाट व्हावी, हा प्रामाणिक उद्देश ठेवून सदर उपक्रम राबविला.

– डॉ. संजय जगताप, उपक्रमशील शिक्षक, येळाणे

हेही वाचा  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news