पुढारी ऑनलाईन डेस्क
कोल्हापूरला महापूराचा धोका कायम आहे. शहरातील अनेक भागात शिरले आहे. दरम्यान, आज शनिवारी (दि.२७) दुपारी ३ वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळ पाणी पातळी ४७ फूट ६ इंचावर गेली. दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोल्हापूरसाठी दोन दिवस महत्त्वाचे आहेत. (Kolhapur Weather Forecast) कारण हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज शनिवारी (दि.२७ जुलै) मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आणि उद्या रविवारी (२८ जुलै) जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होऊन तो हलका ते मध्यम स्वरुपाचा राहील, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
रेड अलर्ट- इशारा (अतिवृष्टी म्हणजेच २०४.४ मिलिमीटर पावसाची शक्यता)
ऑरेंज अलर्ट- सतर्क असावे (मुसळधार पाऊस-११५.५-२०४.४ मिलिमीटर पर्यंत पाऊस)
यलो अलर्ट- लक्ष असावे (६४.५- ११५.५ मिलिमीटर पावसाची शक्यता)
ग्रीन अलर्ट- धोक्याची सूचना नाही
आज कोल्हापूरसह पुणे, सातारा (आज आणि उद्या), भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. रायगडसाठी उद्या रविवारी ऑरेंज अलर्ट राहील. तसेच उद्या पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, विदर्भ येथे यलो अलर्ट दिला आहे.
गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर (सातारा), चंदगड, शाहुवाडी, राधानगरी (कोल्हापूर), वेल्हे (पुणे) येथे मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
कोल्हापुरात पुराचे पाणी (Kolhapur Flood) शिरल्याने महापुराची धास्ती वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शनिवारी (दि.२७) कोल्हापुरातील आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दिल्लीत निती आयोगाच्या बैठकीला जाण्यापूर्वी कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी चर्चा केली. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती, अतिवृष्टी, मदत आणि बचाव कार्याची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेऊन आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोल्हापुरात बचावकार्यासाठी आवश्यकता भासल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या पाठविण्यात याव्यात. प्रसंगी सैन्यदलाची मदत घेण्यात यावी. त्याचबरोबर अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्या आहेत.