कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा
कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड विभागातील 17 हेक्टर भाजीपाला 60 हेक्टर सोयाबीन, 25 हेक्टर अडसाली ऊस तर 24 हेक्टर भुईमुंग बुडीत झाले आहेत. या शिवारात कृष्णा, पंचगंगा नद्यांचे पाणी आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. (Kolhapur Flood)
दरम्यान मळी शेती पाण्याखाली गेल्याने जनावरांच्या वैराणीचा ही प्रश्न निर्माण झाला आहे. कुरुंदवाड विभागातील मजरेवाडी, बस्तवाड, तेरवाड, कुरुंदवाड, नांदणी रस्ता जुना शिरोळ रस्ता या परिसरातील कोथमीर मेथीची भाजी, वांगी, दोडका, भेंडी, कोबी गड्डा या भाजीपाल्याच्या शिवारात पाणी शिरले आहे.(Kolhapur Flood)
17 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्र नोंद आहे. कृष्णा-पंचगंगा नदी काठावरील 60 हेक्टर सोयाबीन तर 25 हेक्टर उसाचे क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. 13 हेक्टर क्षेत्रातील भुईमुंग शेंगाही पाण्याखाली गेल्या आहेत. कृष्णा-पंचगंगा नदी काठावरच या शेती असल्याने उन्हाळ्यात ही पिके टिकवणे शेतकऱ्यांसमोर आवाहन होते. दरम्यान महापुराचे पाणी आल्याने ही सर्व पिके पाण्याखाली गेली आहेत.(Kolhapur Flood)
या महापुराच्या पाण्याने शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याविना पिके कोमजली तर पावसाळ्यात महापुराच्या पाण्याने पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी पुरता आर्थिक संकटात सापडला आहे. तेरवाड भाग परिसरातील शेतीतही पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाचे पाणी साचून राहिल्याने ते सोयाबीन पीकही अडचणीत आले आहे.(Kolhapur Flood)