कोल्हापूर ः कोल्हापूर जिल्ह्यात बंडखोरीचा वणवा पेटला असून सर्वच पक्षांच्या नेत्यांसमोर ही बंडखोरी रोखण्याचे आव्हान आहे. कोल्हापूर उत्तर, करवीर, राधानगरी-भुदरगड, चंदगड, इचलकरंजी, शिरोळ, हातकणंगलेत बंडखोरांचा जोर आहे. आता अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत बंडखोरांची समजूत काढली जाणार आहे.
कोल्हापूर उत्तरमध्ये अनपेक्षितरीत्या बंडखोरी झाली. काँग्रेसने राजेश लाटकर यांना उमेदवारी देताच काँग्रेसच्याच वर्तुळातून त्यांना विरोध झाला. काँग्रेस कमिटीवर दगडफेक होऊन लाटकर यांना धक्काबुक्की झाली. या विरोधाच्या दबावातून उमेदवार बदलण्याची नामुष्की काँग्रेसवर आली. ऐनवेळी मधुरिमाराजे यांना उमेदवारी द्यावी लागली. त्यांचे सासरे शाहू महाराज हे सध्या काँग्रेसचे खासदार आहेत. त्यांच्या उमेदवारीनंतर राजेश लाटकर यांनी आपला अर्ज कायम ठेवला असून आपण निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कोल्हापूरच्या या उमेदवार बदलण्याच्या राजकारणामागे कोणाचा हात याचीच चर्चा सुरू आहे.
करवीर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे चंद्रदीप नरके यांच्या विरोधात महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे संताजी घोरपडे यांनी बंडखोरी केली आहे. तेथे राहुल पाटील हे काँग्रेसचे उमेदवार आहेत.
इचलकरंजीला महायुती आणि महाआघाडी या दोन्ही ठिकाणी बंडखोरी झाली आहे. महायुतीकडून भाजपचे राहुल आवाडे रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विठ्ठल चोपडे यांनी बंडखोरी केली आहे तर भाजपचे हिंदूराव शेळके यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मदन कारंडे यांना पाठिंबा दिला आहे. सागर चाळके हेही त्यांच्या समवेत आहेत तर सुहास जांभळे यांनी बंडखोरी केली आहे.
राधानगरी-भुदरगडला मेहुण्या-पाहुण्यातील असंतोष पुन्हा एकदा उफाळला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार के. पी. पाटील यांच्या विरुद्ध ए. वाय. पाटील यांनी शक्तिप्रदर्शन करीत बंडखोरी केली आहे. ही बंडखोरी थांबवण्याचे आव्हान असेल. तेथे प्रकाश आबिटकर महायुतीचे उमेदवार आहेत.
चंदगडला विद्यमान आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश पाटील यांच्या विरोधात भाजपचे शिवाजीराव पाटील यांनी दंड थोपटले आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या डॉ. नंदा बाभूळकर यांच्या विरोधात काँग्रेसचे विनायक पाटील, गोपाळराव पाटील यांनी अर्ज भरले आहेत. विनायक पाटील निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे सांगण्यात येते तर मानसिंग खोराटेही रिंगणात असून त्यांना जनसुराज्य शक्तीचा पाठिंबा मिळाला आहे.
हातकणंगलेत डॉ. सुजित मिणचेकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश करून उमेदवारी दाखल केली आहे. राजूबाबा आवळे हे काँग्रेसचे विद्यमान आमदार रिंगणात आहेत. मिणचेकर तेथून ठाकरे शिवसेनेतून इच्छुक होते. महायुतीकडून जनसुराज्य शक्ती पक्षाचे डॉ. अशोकराव माने येथून उमेदवार आहेत.
शिरोळमध्ये महायुतीतून राजर्षी शाहू विकास पक्षाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर हे विद्यमान आमदार रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे माजी पक्षप्रतोद विजय भोजे व भाजपचे माजी तालुका अध्यक्ष मुकुंद गावडे यांनी उमेदवारी दाखल केली आहे तर काँग्रेसचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार उल्हास पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश करून बंडखोरी केली आहे.
शाहूवाडी पन्हाळामध्ये महायुतीमार्फत जनसुराज्य शक्ती पक्षाचे विद्यमान आमदार विनय कोरे निवडणूक लढवत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर हे त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत. करवीरमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाने आपला उमेदवार मागे न घेतल्यास शाहूवाडीमध्ये आमची ताकद दाखवू, असा इशारा करवीरचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार चंद्रदीप नरके यांनी दिला आहे.