ओवळा माजिवडा विधानसभेचे 15 वर्ष आमदार असलेले शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक हे अब्जाधीश आहेत. सरनाईक यांची जंगम आणि स्थावर अशी मिळवून 271 कोटी 28 लाखांची एकूण संपत्ती आहे. त्यांच्या नावावर एकही चार अथवा दुचाकी वाहन नसून व्यवसायाने बिल्डर असलेल्या सरनाईक यांच्यावर सुमारे 194 कोटी 43 लाखांचे कर्ज आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे 2009 पासून ओवळा माजिवडा मतदार संघाचे आमदार आहेत. त्यापूर्वी हे ठाणे महापालिकेत नगरसेवक होते. सरनाईक यांच्यावर ईडीचे दोन गुन्हे दाखल असून विविध पोलीस ठाण्यात अन्य किरकोळ गुन्हेही दाखल आहेत. सरनाईक हे अरबपती आमदार आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात 56 कोटी 30 लाख 97 हजार 283 रुपयांची जंगम मालमता तर 124 कोटी 97 लाख 42 हजार 364 स्थावर मालमता आहे. पत्नीच्या नावावर दोन चार चाकी वाहने आहेत. सरनाईक यांच्याकडे एक रिव्हॉवर आणि एक बंदूक आहे. त्यांची पत्नी परीक्षा सरनाईक यांनी 5 कोटी 56 लाख 68 हजरांचे कर्ज घेतलेले आहे. त्यांच्याकडे 17 कोटी 66 लाखांची स्थावर मालमत्ता असून 44 कोटी 38 लाख 55 हजारांची जंगम मालमता असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन विचारे हे कोट्यधीश असून त्यांच्याकडे जंगम आणि स्थावर मिळून 23 कोटीं 24 लाखांची संपत्ती आहे. नगरसेवक, महापौर, आमदार आणि दोनदा खासदार राहिलेले राजन विचारे यांनी पुन्हा ठाणे विधानसभा मतदार संघातून ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. विचारे यांनी त्यांच्या संपत्तीचे विवरणपत्र दिले असून त्यानुसार राजन विचारे यांच्याकडे सुमारे 23 कोटी 24 लाखांची संपत्ती आहे. त्यांच्याकडे 2 कोटी 40 लाखाची जंगम आणि 20 कोटी 67 लाखांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांची पत्नी नंदिनी विचारे यांच्याकडे 8 कोटी 43 लाखांची संपत्ती आहे. त्यात 3 लाख 28 लाखांच्या जंगम मालमत्तेचा समावेश आहे. राजन विचारे यांच्यावर 4 कोटी 46 लाखांचे कर्ज आहे.
ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघाचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार नरेश मणेरा हे करोडपती असून त्यांच्याकडे 28 कोटींची संपत्ती आहे. त्यांच्यावर सुमारे 58 लाखांचे कर्ज आहे. मणेरा हे शिवसेनेचे नगरसेवक, उपमहापौर म्हणून ठाणे महापालिकेत सक्रिय होते. त्यांना शिवसेना उबाठा गटाने उमेदवारी दिली आहे. त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात 3 कोटी 62 हजारांची जंगम मालमत्ता आणि 24 कोटी 6 लाखांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांची पत्नी आणि मुलीकडे आठ कोटींची संपत्ती आहे. त्यांच्या नावावर तीन वाहने आहेत.