

कोल्हापूर : कोणत्याही दबावाला बळी न पडता, तटस्थपणे आणि पारदर्शकतेने जिल्ह्यात ‘एसआयआर’ (विशेष सखोल पुनरिक्षण) राबवा, असे आदेश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी मतदार नोंदणी अधिकार्यांना दिले. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या एसआयआर कार्यक्रमाचा बुधवारी त्यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात ही बैठक झाली.
मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करून विशेष सखोल पुनरिक्षणानंतर दोषविरहित आणि अद्ययावत नवीन मतदार यादी अस्तित्वात येणार आहे, असे सांगत चोकलिंगम म्हणाले, जून ते ऑक्टोबर या कालावधीत गणना अर्जांची छपाई, बीएलओ प्रशिक्षण, घराघरांत जाऊन गणना प्रपत्रांचे वाटप आणि संकलन ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. नागरिकांसाठी ऑनलाईन प्रपत्र भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रपत्रांचे वाटप व संकलन करताना कुटुंबातील व्यक्तीची सही बंधनकारक आहे. प्रत्येक घर, झोपडी किंवा निवासस्थानाला स्वतंत्र ओळख क्रमांक, कुटुंबाचा संपर्क क्रमांक आणि पत्ता नोंदविणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रत्येक बीएलओ आणि बीएलए यांना योग्य प्रशिक्षण द्या, असेही आदेशही त्यांनी दिले.
झोपडपट्ट्या, दुर्गम भाग तसेच तृतीयपंथीयांसह सर्व घटकांतील नागरिकांचा मतदार यादीत समावेश करा. आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्या. प्रत्येक आठवड्याला कामाची प्रगती, आक्षेप, नवीन नोंदणी आणि इतर तपशील राजकीय पक्षांच्या निदर्शनास आणून पारदर्शकता वाढवा, असेही त्यांनी सांगितले. प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना नष्टे यांच्यासह सर्व मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते. बैठकीपूर्वी चोकलिंगम यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांची बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.
जिल्ह्यात 80.91 टक्के मॅपिंग पूर्ण
जिल्ह्यात 80.91 टक्के मॅपिंग पूर्ण झाले आहे. उर्वरित मॅपिंगची गती वाढवा, असे सांगत मॅपिंगदरम्यान मतदार आढळून न आल्यास त्याची माहिती बीएलएला देऊन त्याच्या स्वाक्षरीसह अहवाल तयार करा. नावे वगळण्याच्या प्रस्तावित याद्या सार्वजनिक करा. एकही पात्र मतदार वगळला जाऊ नये, एकही अपात्र व्यक्ती यादीत राहू नये, अशी भूमिका ठेवा, असेही चोकलिंगम यांनी सांगितले.
असे आहे वेळापत्रक
20 ते 29 जून - गणना अर्जांची छपाई आणि बीएलओ प्रशिक्षण
30 जून ते 29 जुलै - बीएलओंकडून घरोघरी मतदारांना गणना
प्रपत्राचे वाटप व भरलेले अर्ज परत घेणे
5 ऑगस्ट - प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध
5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर - प्रारूप यादीवर दावे व हरकती नोंद
3 ऑक्टोबर - पर्यंत दावे व हरकती निकालात काढणार
7 ऑक्टोबर- अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
कोल्हापूर : बैठकीत बोलताना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम. सोबत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड.