कोल्हापूर : भोगावती कारखान्याच्या प्रसिद्ध मतदार यादी हरकतीवर बुधवारी सुनावणी
राशिवडे (कोल्हापूर); पुढारी वृतसेवा : भोगावती कारखान्याच्या मतदारयादीवर सर्वपक्षीयानी घेतलेल्या हरकतीवर बुधवारी साखर सहसंचालक ए.व्ही.गाडे यांच्या समोर सकाळी ११ वा. सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतरच पुढील निवडणूक कार्यक्रमाची दिशा निश्चित होण्याची शक्यता आहे.
भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने नुकतीच २७ हजार ५५८ सभासदांची मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीवर भाजप, काँग्रेस (सतेज पाटील गट), शेकाप, शिवसेना आदीनी हरकत घेतली आहे.
यामध्ये २६८३ पात्र मतदारांची नावेच यादीतून गहाळ केल्याची तक्रार केली आहे. हे सर्व सभासद कारखान्याचे कायदेशीर सभासद असून त्यांना वगळण्याची कारणे नाहीत. ते अपात्र किंवा स्वतःहून सभासदत्वाचा राजीनामा दिलेला नाही ते नियमानुसार निवडणुकीचे मतदार ठरू शकतात, असे मत सर्वपक्षीयांनी निवेदनातुन व्यक्त केले होते. या हरकतीवरच श्री.गाडे यांचेसमोर सुनावणी होणार असुन २६८३ सभासद पात्र ठरणार की अपात्र या यानंतर फैसला होणार आहे.
या सुनावणीनंतरच निवडणुकीची दिशा स्पष्ट होणार आहे. कारखान्याच्या म्हणण्यानुसार निवडणुकीसाठी ३९१२ सभासद अपात्र झाले होते, या सर्व सभासदांना अपुऱ्या कागपत्राबाबत नोटीसा पाठविल्या होत्या, यामधील १२१९ सभासदांनी अपुऱ्या कागदपत्रांची पुर्तता केल्याने ते पुन्हा पात्र ठरले. परंतु यामधील २६८३ सभासदांनी कागदपत्रांची पुर्तता न केल्याने ते अपात्र ठरले आहेत.
अधिक वाचा :