

Hatkanangale Taluka Drought Affected List
पेठवडगाव : पावसाच्या अनियमिततेमुळे आणि खरीप पिकांच्या नुकसानीमुळे अडचणीत सापडलेल्या हातकणंगले तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. आमदार डॉ. अशोकराव माने यांनी यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
मुंबई येथे माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी सांगितले की, हातकणंगले तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश व्हावा, अशी मागणी आमदार डॉ. अशोकराव माने यांनी वारंवार शासनाकडे केली होती. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणेला तालुक्याची प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. प्राप्त अहवालाच्या आधारे शासनाने तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याचा निर्णय घेतला. या पाठपुराव्याबद्दल बावनकुळे यांनी आमदार माने यांचे अभिनंदन केले.
खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळ व्यवस्थापन संहितेतील तांत्रिक निकषांनुसार हातकणंगले तालुका सुरुवातीच्या दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आला होता. २५ सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबर रोजी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये ट्रिगर १ आणि ट्रिगर २ निकषांनुसार दुष्काळ जाहीर केला होता. मात्र, हातकणंगलेचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती.
तालुक्यात २० ऑगस्ट ते २० सप्टेंबरदरम्यान टप्प्याटप्प्याने ८ ते १० दिवसांचे पावसाचे खंड पडले. त्यामुळे सोयाबीन, भुईमूग आणि अन्य खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम झाला. फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण बसल्याने उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली होती. भूजल पातळी खालावल्याने आगामी रब्बी हंगामाबाबतही शेतकरी चिंतेत होते.
या परिस्थितीची दखल घेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे आणि आमदार डॉ. अशोकराव माने यांनी कोल्हापूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हातकणंगले तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेनंतर आणि क्षेत्रीय पाहणी अहवालानंतर शासनाने हा निर्णय घेतला.
तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाल्याने शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती, आर्थिक मदत आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.