

Hasan Mushrif on Shaktipeeth Highway
कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध सुरु असून याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ''शक्तिपीठ महामार्ग कोल्हापुरातून रद्द संदर्भातील अधिसूचना निवडणुकीपूर्वीच रद्द केली होती. कोल्हापुरातून जाणाऱ्या मार्गाबाबत भूमीसंपदानाची रद्द झालेली प्रक्रिया पुनर्स्थापित करण्याबाबतच्या मुद्द्याला मी आणि मंत्री आबिटकर यांनी विरोध केला होता. शक्तिपीठ महामार्ग संदर्भात आम्हाला मुख्यमंत्री जेव्हा बोलवतील तेव्हा आम्ही आमची भूमिकादेखील मांडू,'' असे मुश्रीफ यांनी सांगितले. जर हा महामार्ग चंदगडमधून जायला शेतकऱ्यांचा विरोध नसेल तर तोदेखील मार्ग अवलंबायला काय हरकत नाही, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. ते कोल्हापुरात शुक्रवारी (दि.४ जुलै) पत्रकारांशी बोलत होते.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असल्याच्या पार्श्वभूमीवरही मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''एका कुटुंबातील दोन भाऊ जर एकत्र येत असतील तर सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. उद्याच्या मेळाव्यालासुद्धा सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. राजकारणात काय बदल होतात? हे नंतर निवडणुकीत जनता ठरवेल. फडणवीस म्हणाले होते, दोन भाऊ एकत्र आले तर दोन वेगळे जीआर काढतो,'' असे मुश्रीफ म्हणाले.
जसं ठाकरे बंधूंनी एकत्र यावे यासाठी शुभेच्छा दिल्या तसंच सगळ्या पवारांनी एकत्र यावे यासाठी शुभेच्छा सर्वांनी दिल्या आहेत. शरद पवार यांनी भाजपसोबत गेलेल्यांसोबत आम्ही जाणार नाही, असे यापूर्वी सांगितले असल्याचे त्यांनी नमूद केले.
नवीन दहा एमबीबीएस महाविद्यालयाला केंद्राने परवानगी दिली आहे. ज्यामध्ये असलेल्या त्रुटीबाबत नोटीस आली होती. त्याला आम्ही उत्तर दिली आहेत. पायाभूत सुविधा आणि कर्मचारी याबाबत काही मुद्दे होते. मात्र जागा कमी करण्यासंदर्भात ज्यांनी कोणी माहिती दिली त्यांनी निदान पहिला अभ्यास करणे गरजेचे आहे. कुठलीही जागा कमी करण्यात आलेली नाही. ज्यांनी कोणी ही माहिती दिली त्यांनी जर माझी भेट घेतली असती तर त्यांच्या बुद्धीमध्ये मीच भर घालेन, असेही त्यांनी नमूद केले.
कोल्हापूर सीपीआर रुग्णालयामधील मृतदेहांच्या हेडसांडीबद्दल मला कल्पना मिळाली. मी आज यासंदर्भात बैठक घेत आहे. सीपीआरच्या अधिष्ठातांकडून याबाबत माहिती घेईन आणि संबंधित प्रकारात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. असे प्रकार पुन्हा होणार नाही याचीही काळजी घेऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे.