

Shaktipeeth Highway
पंढरपूर : रस्त्यावर उतरून आंदोलनं केली, विधिमंडळात आवाज उठवला, पण सरकार ऐकत नाही. त्यामुळे आता थेट विठ्ठलास साकडं घालण्यासाठी शक्तिपीठ महामार्गविरोधी आंदोलक पंढरपुरात दाखल झाले आहेत. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील, नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आज १२ जिल्ह्यातील शेतकरी पंढरपुरात विठ्ठलाच्या चरणी महामार्ग रद्द करण्यासाठी प्रार्थना करणार आहेत.
या आंदोलनाविषयी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. "शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा, ही आमची ठाम भूमिका आहे. आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केलं, विधिमंडळातही आवाज उठवला, पण हे सरकार जनतेचं किंवा लोकप्रतिनिधींचं ऐकायला तयार नाही. त्यामुळे आता सरकार विठ्ठलाचं तरी ऐकतं का, हे पाहण्यासाठी आम्ही त्याला साकडं घालणार आहोत," असं पाटील म्हणाले.
देवाच्या माध्यमातून तरी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकावं, अशी अपेक्षा व्यक्त करत पाटील म्हणाले, "येत्या ६ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेवेळी, त्यांना या महामार्गाबाबत फेरविचार करण्याची सद्बुद्धी मिळावी, यासाठी आम्ही आज प्रार्थना करणार आहोत. हे पूर्णपणे शेतकऱ्यांचं आंदोलन असून, याला कोणताही राजकीय रंग देऊ नये," असे आवाहनही त्यांनी केले.
"मुख्यमंत्र्यांनी जसा हिंदी भाषेच्या वापराबाबत दोन पाऊलं मागे घेण्याचा निर्णय घेतला, तसाच निर्णय शक्तिपीठ महामार्गाबाबतही घ्यावा. चांगला निर्णय घेण्यासाठी कधीकधी मागे यावं लागतं," असा सल्लाही त्यांनी दिला. सरकार ज्या एक हजार शेतकऱ्यांच्या समर्थनाचा दावा करत आहे, त्यांची नावे जाहीर करावीत, असे आव्हान देत पाटील म्हणाले, "ज्यांच्या जमिनी जाणार आहेत, ते शेतकरी आमच्यासोबत आहेत. ज्यांच्या जमिनी जाणार नाहीत, त्यांनी समर्थन देण्याला काहीही अर्थ नाही."
लोकशाहीतील सर्व आयुधं वापरूनही सरकार दडपशाहीने हा महामार्ग रेटून नेत असल्याचा आरोप त्यांनी केला. "हा महामार्ग महाराष्ट्राला दिवाळखोरीत नेणारा आहे. नाना पटोले यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना पदावरून बडतर्फ करण्यात आलं. यातून महायुती सरकार स्पष्ट संदेश देत आहे की, जो कुणी शेतकऱ्यांच्या बाजूने बोलेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल," अशी टीकाही त्यांनी केली.
एकंदरीत, रस्त्यावरील आणि सभागृहातील लढ्यानंतर आता शक्तिपीठ महामार्गविरोधी आंदोलनाने भावनिक आणि आध्यात्मिक वळण घेतलं आहे. सरकारवर दबाव वाढवण्यासाठी आता थेट पंढरीच्या विठुरायालाच आवाहन करण्यात येत असून, या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.