

शिरढोण : टाकवडे (ता.शिरोळ) येथे वाढत्या बेकायदेशीर गावठी दारू विक्री व अवैध व्यवसायाविरोधात ग्रामपंचायतीने अखेर आक्रमक भूमिका घेतली आहे. भूमसेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल शंकर फडके आणि अमृत सावंत यांनी ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार दाखल करत गावातील अवैध धंद्यांकडे लक्ष वेधले होते. या तक्रारीची गंभीर दखल घेत ग्रामपंचायतीने जिल्हा पोलीस प्रमुख तसेच शिरोळ पोलिस ठाण्याकडे संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
टाकवडे व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून गावठी दारू विक्रीव अनेक प्रकारचे अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांतून सातत्याने पुढे येत होत्या. यामुळे सामाजिक वातावरण बिघडत असून तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जात असल्याची चिंता व्यक्त होत होती. भूमसेना संघटनेने याबाबत पुढाकार घेत ग्रामपंचायतीकडे निवेदन दिले.
दरम्यान, ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत हा विषय चर्चेस घेण्यात आला. सभेत अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, असा ठराव मंजूर करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या या भूमिकेमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून परिसरात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.
गांजा विक्री व सेवन करणाऱ्यांवर करडी नजर...
टाकवडे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात अवैध धंद्यांसह गांजा विक्री व सेवन सुरू आहे का, याची माहिती घेतली जात असल्याचे गटनेते अमोल चौगुले व उपसरपंच अमोल पाटील यांनी दिली. सामाजिक शांतता व कायदा सुव्यवस्था बिघडविणाऱ्या प्रवृत्तींविरोधात ठोस कायदेशीर कारवाई केली जाणार असून कोणाचीही भीड राखली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे अवैध धंद्यांना चाप लागणार असल्याचे बोलले जात आहे.