

कोल्हापूर : "२०२९ पूर्वी २०२७ आहे, हे आमदार सतेज पाटील यांनी पक्के लक्षात ठेवावे. गोकुळची अध्यक्षनिवड पार पडल्यानंतर विधान परिषदेचा आखाडा सुरू होणार आहे, त्यामुळे विजयाचा इतका उन्माद कामाचा नाही," असा थेट इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी दिला. गोकुळच्या अध्यक्षनिवडीवरून तापलेल्या राजकीय वातावरणात महायुतीच्या नेत्यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर चौफेर तोफा डागत जोरदार हल्लाबोल केला.
‘‘गोकुळच्या अध्यक्षनिवडीचा तिढा सोडविण्यासाठी समन्वयाची भूमिका घेण्याऐवजी आ. सतेज पाटील यांनी मोर्चातून शक्तिप्रदर्शन केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना हटवून स्वतः त्या पदावर विराजमान होण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. त्यासाठीच त्यांनी सोमवारी राज्यभरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना कोल्हापुरात आणले. गोकुळचा प्रश्न जिल्ह्यापुरता मर्यादित असताना स्वतःची राजकीय प्रतिमा उंचावण्यासाठी त्यांनी हा डाव खेळला,’’ असा घणाघात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, "शासनाचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हणणाऱ्यांनी न्यायालयात जाऊन कोरम रद्द करून आणायला हवा होता. आम्ही त्यांना अध्यक्षनिवडीपासून अडवले नव्हते." तसेच योग्य वेळ आल्यावर शशिकांत पाटील-चुयेकर यांनाच अध्यक्ष करणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
दुसरीकडे, आ. सतेज पाटील यांनी अध्यक्षनिवडीत समन्वयातून मार्ग काढणे आवश्यक होते; मात्र आता न्यायालयानेच त्यांना चपराक दिली आहे, अशी खोचक प्रतिक्रिया पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेला आ. चंद्रदीप नरके, आ. अमल महाडिक, माजी खा. संजय मंडलिक, माजी आ. के. पी. पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील उपस्थित होते.
‘त्यांनी संचालकांना उपस्थित ठेवण्यास सांगितले’
आ. सतेज पाटील यांनी २८ ऑक्टोबरला फोन करून संचालकांना अध्यक्षनिवड बैठकीला उपस्थित ठेवण्यास सांगितले होते. मात्र, एकत्र बसून चर्चा करू, सत्ता वाटून घेऊ, असा कोणताही प्रस्ताव त्यांनी दिला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
"सतेज पाटील यांच्यावर केलेल्या जातीयवादाच्या आरोपाचे ठोस पुरावे माझ्याकडे आहेत. मात्र, ते जाहीर करण्याची अद्याप वेळ आलेली नाही. योग्य वेळ आल्यावर ते पुरावे समोर आणेन," असा इशारा मंत्री मुश्रीफ यांनी दिला. तसेच सतेज पाटील यांनी मला सोडून गोकुळच्या दोन-तीन निवडणुका लढवल्या; मात्र मी त्यांच्यासोबत आल्यानंतरच ते गोकुळमध्ये पाय रोवू शकले, असा पलटवारही त्यांनी केला.