कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार व यशस्वी उद्योजक आमदार चंद्रकांत जाधव यांचे हैदराबाद येथे दुःखद निधन झाले. हैदराबादमधून त्यांचे पार्थिव दुपारी एक वाजता काँग्रेस कमिटी कार्यालय येथे आणण्यात येणार आहे. दुपारी १ ते १.३० वाजेपर्यंत काँग्रेस कमिटी कार्यालयात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सम्राटनगर येथील घरी पार्थिव नेण्यात येणार आहे. दुपारी १.३० ते ३ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव सम्राटनगर येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
दुपारी तीन वाजता घरातून अंत्ययात्रा सुरू होईल. ती कोल्हापूर उद्यम सोसायटी, जाधव आयर्न वर्क्स, हुतात्मा पार्क, पीटीएम तालीम, कैलासगडची स्वारी मंदिर, मंगळवार पेठे येथील आमदार चंद्रकांत जाधव यांचे जनसंपर्क कार्यालय, बालगोपाल तालीम मंडळ, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी मार्गे पंचगंगा स्मशानभूमीकडे मार्गस्थ होईल.
जाधव यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने दु:ख व्यक्त केले आहे. "कोल्हापूर उत्तर विधानसभेचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. कोल्हापूर शहराच्या व उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील असणारा लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत." असे काँग्रेसने ट्विट करत म्हटले आहे.