

नृसिंहवाडी : दैनिक पुढारीचे मुख्य संपादक, पत्रमहर्षी, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त श्रीक्षेत्र नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे श्री दत्तचरणी महाअभिषेक करण्यात आला. यावेळी समस्त ब्रह्मवृंदांकडून मंत्रघोषात डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी विविध धार्मिक विधींचे पौरोहित्य ज्येष्ठ पत्रकार विनोद पुजारी यांनी केले. यावेळी नृसिंहवाडी प्रतिनिधी दर्शन वडेर, दत्त देवस्थानचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण रुक्के पुजारी, संजय उर्फ सोनू पुजारी, सुमेध पुजारी उपस्थित होते.
डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा व त्रिपुरारी पौर्णिमा असा योगायोग आल्याने त्यांच्या अभिष्टचिंतनाप्रित्यर्थ विविध धार्मिक करण्यात आले. सकाळी श्रींच्या चरणकमलावर दुग्धाभिषेक व पूजा करण्यात आली. त्यांना भावी आयुष्य आरोग्यपूर्ण लाभावे यासाठी श्री चरणी श्रीफळ अर्पण करण्यात आला. विनोद पुजारी म्हणाले, "डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे तीर्थक्षेत्राच्या विकासात मोठे योगदान आहे. त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे 2016 साली कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यासाठी शासनाकडून 121 कोटींचा निधी मिळाला होता.
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी तीर्थक्षेत्रांवर त्यांची विशेष श्रद्धा असून येथील विविध प्रश्नांसाठी त्यांनी नेहमी आग्रही भूमिका घेतली आहे." तसेच येथील श्री महादबा पाटील महाराज समाधी मंदिरात विविध पूजा करण्यात आल्या. प. पू. पाटील महाराज यांच्यावर पुढारीकार ग. गो. जाधव यांच्यापासून जाधव कुटुंबीयांची श्रद्धा असून समाधी मंदिरात डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे सचिव धनाजीराव जगदाळे, मुख्य व्यवस्थापक उमेश निकम उपस्थित होते.