

कोल्हापूर : दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक, पत्रमहर्षी, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त साजरा झालेला ‘सहस्रचंद्रदर्शन सोहळा’ लोकोत्सवाच्या स्वरूपात मोठ्या दिमाखात पार पडला. पोलिस ग्राऊंडवर झालेल्या या भव्य सोहळ्यात कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या निमित्ताने संपूर्ण शहरच ‘पुढारी’ झाले होते. सोशल मीडियावर ‘द किंग ऑफ मीडिया’, ‘पत्रमहर्षी’, ‘संपादक नव्हे, विचारांचे शिल्पकार’ अशा संदेशांसह डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉटस्अॅप स्टेटसवर सोहळ्यातील द़ृश्ये, गर्दीचे फोटो, व्हिडीओ आणि डॉ. जाधव यांच्या सोबत घेतलेले सेल्फी तुफान व्हायरल झाले.
अनेकांनी डॉ. जाधव यांच्या समाजकारण, पत्रकारिता आणि विविध आंदोलनांतील नेतृत्वाची आठवण सोशल मीडियावर शेअर केली. विशेषतः टोलमाफी आंदोलन आणि खंडपीठासाठी झालेल्या जनआंदोलनांचे फोटो व व्हिडीओ स्टेटसवर शेअर केले जात होते. काहींनी ‘सिंहायन’ या आत्मचरित्राचे फोटो पोस्ट करत त्यांच्या प्रेरणादायी वाटचालीला सॅल्युट केला. ‘पुढारी’ आणि डॉ. जाधव यांच्या कार्याचे दर्शन घडवणारे बॅनर शहराच्या प्रमुख चौकांत झळकत होते आणि ते सोशल मीडियावर देखील पाहायला मिळत होते. याशिवाय अनेकांनी डॉ. जाधव यांचे छायाचित्र स्टिपलिंग आर्टद्वारे रेखाटले व ते सोशल मीडियावर शेअर केले.
सोशल मीडियावरून डॉ. जाधव यांच्यावर शुभेच्छांचा अक्षरशः महापूर उसळला होता. ‘सहस्रचंद्र तेज लाभो आपल्या कारकिर्दीला’, ‘पत्रकारितेचे विद्यापीठ पुढारी’, ‘कोल्हापूरच्या प्रगतीचा आवाज डॉ. प्रतापसिंह जाधव’ अशा हजारो संदेशांनी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉटस्अॅप प्लॅटफॉर्म्स गाजले. रील्स, फोटो आणि व्हिडीओ केवळ देशभरातूनच नव्हे, तर परदेशातूनही ट्रेंडिंगवर होते. अनेकांनी कार्यक्रम पत्रिका व फलकांचे फोटो शेअर करून नागरी सत्काराचे निमंत्रण देत आनंद व्यक्त केला. या भव्य सोहळ्याने दैनिक ‘पुढारी’ आणि डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे समाजातील कार्य सोशल मीडियावर चर्चेच्या केंद्रस्थानी होते. अख्खे कोल्हापूर शहर आणि सोशल मीडिया ‘पुढारी’ झाला होता. जिथे पाहावे तिथून ‘द किंग ऑफ मीडिया’ डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत होता.
सोहळ्यात मान्यवरांच्या भाषणे संपताच डॉ. प्रतापसिंह जाधव स्टेजवरून खाली उतरताच उपस्थित जनसमुदायाने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली. अनेकांनी साहेबांसोबत सेल्फी घेण्यासाठी उत्साहाने पुढे सरसावत फोटो घेतले, तर काहींनी सोहळ्याच्या परिसरातच सेल्फी काढून ‘सेल्फी विथ साहेब’ अशी कॅप्शन देत ते फोटो सोशल मीडियावर शेअर केले.