

कोल्हापूर ः ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या जीवनाचा वेध घेणारे ‘सिंहायन’ या आत्मचरित्रास वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निमित्त होते डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या 80 व्या वाढदिवसाचे!
या निमित्ताने त्यांचा बुधवारी कोल्हापूरच्या पोलिस परेड ग्राऊंडवर भव्य सत्कार सोहळा आयोजित केला होता. कार्यक्रमाला सुरुवात होताच वाचकांनी बुक स्टॉलवर जाऊन ‘सिंहायन’ या आत्मचरित्राबाबत विचारणा केली आणि ते तत्काळ खरेदी करण्यास सुरुवात केली. कारण सर्वांनाच डॉ. जाधव आणि दैनिक ‘पुढारी’च्या आतापर्यंतच्या यशस्वी वाटचालीबाबत जाणून घेण्याची उत्सुकता होती. त्यामुळे वाचकांनी बुकस्टॉल भोवती मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास सुरुवात केली. एका अपंग वाचकाने तर ‘सिंहायन’ हे आत्मचरित्र तत्काळ खरेदी करून डॉ. जाधव यांच्याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर अन्य वाचकांनीही हे पुस्तक खरेदी करण्यास सुरुवात केली, जणू काही हे पुस्तक खरेदी करण्यासाठी झुंबडच उडाली होती. डॉ. जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने ‘सिंहायन’ किंमत सवलतीच्या दरात म्हणजे 550 इतकी ठेवली होती. त्यामुळे वाचकांनी ते पुस्तक खरेदी करण्यास गर्दी केली आणि काही तासांतच ‘सिंहायन’च्या हजारो प्रती विकल्या गेल्या हे विशेष!