

कोल्हापूर : पुणे पदवीधर मतदारसंघात उमेदवारी मिळणे ही नवरात्रात अंबाबाईचाच आशीर्वाद आहे. देवीनेच माझ्या हाती कमळ दिले आहे. त्यामुळे या निवडणुकीत माझा विजय निश्चित आहे, असा विश्वास पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांनी व्यक्त केला.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोल्हापूर भाजप कार्यालयात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. कोल्हापूरची सून झाल्यानंतर गेल्या २५ वर्षांपासून मी दरवर्षी देवीचा आशीर्वाद घेत असते. त्याचमुळे अचानक या मतदारसंघात माझी उमेदवारी हा दैवी संकेत आहे, असा माझा विश्वास आहे.
डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून गेल्या ३० वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, ‘पुढारी’ वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांच्या भावना आणि त्यांचा आवाज सरकारपर्यंत कसा पोहोचवायचा, याचा दीर्घ वारसा पाठीशी आहे. याच अनुभवाच्या बळावर मतदारसंघातील युवक व पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करीन. मतदारसंघातील सर्व ५८ तालुक्यांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करणे, करिअर मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, सर्व तालुक्यांमध्ये यूपीएससी, एमपीएससीसह इतर स्पर्धा परीक्षा ट्रेनिंग सेंटरची निर्मिती करणे, या बाबींचा माझ्या वचननाम्यात समावेश आहे, असेही त्या म्हणाल्या.
भाजपचे शहराध्यक्ष विजय जाधव म्हणाले, २००८ पासून पुणे पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. मागील निवडणुकीत येथे पराभव पत्करावा लागला असला, तरी त्यानंतर पक्षाने सर्वाधिक मतदारांची नोंदणी केली आहे. बूथ लेव्हलपर्यंत मजबूत नियोजन केल्यामुळे यंदा आपला विजय निश्चित आहे.
ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले, निवडणुकीत कधीही गाफील राहून चालणार नाही. जास्तीत जास्त मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेऊन मतदान करून घेणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष विजय जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, पदवीधर नोंदणी प्रमुख संतोष लाड, विराज चिखलेकर, अमर साठे, शिवाजी बुवा, सयाजी आळवेकर, अजितसिंह देसाई, सुशीला पाटील, महेश पाटील, भिकाजी जाधव यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.