

दानोळी : पुढारी वृत्तसेवा
दानोळी येथील तरुण व्यावसायिक भरतेश राजगोंडा टोपगोंडा (वय - ४०) याचे सोमवारी रात्री नऊ वाजता अज्ञातांनी अपहरण केले आहे. अपहरणानंतर भरतेशच्या मोबाईलवरूनच चुलत भावाला फोन करून २५ लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले.
दोन मित्र आणि भाऊ महावीर हे सांगितलेल्या ठिकाणावर गेले असता पुन्हा फोन करून दोन वेळा येण्याचे ठिकाण बदलण्यात आले आणि नंतर फोन बंद झाला. दरम्यान, काही ग्रामस्थांनी जयसिंगपूर पोलीस ठाणे गाठत घटनेची माहिती दिली. आलेल्या फोनचे रेकॉर्डिंग ऐकवले; पण फक्त मिसिंगची नोंद घेऊन “उद्या बघू” असे सांगितले. यावर ग्रामस्थांनी स्वतः पोलीस पाटील प्रशांत नेजकर यांना सोबत घेऊन शोधाशोध केली.
तेव्हा शहरीमळा रस्त्यावर उसामध्ये भरतेशची गाडी आणि चप्पल आढळून आली, तर त्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीचा एक मफलर आणि नाईट बूटही आढळून आले. तेथे झटापट झाल्याचेही जाणवत होते.
दरम्यान, सकाळी अकरा वाजता पोलीस निरीक्षक गोरे घटनास्थळी आले. तेव्हा “योग्य वेळी तपास सुरू झाला नाही आणि पुन्हा तीच तीच माहिती मागत आहात” असे म्हणत ग्रामस्थांनी पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तर “तपास केला जाईल, काळजी करू नका” असे गोरे यांनी सांगितले.